सध्याच्या घडीला मराठी टेलिव्हीजन विश्वात तुझ्यात जीव रंगला ही मालिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. सरळ साधं राहणीमान आणि त्यातही ग्रामीण भागातील वागण्या- बोलण्यावर दिलेला भर पाहता ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. कुस्तीच्या आखाड्यात, लाल मातीत घाम गाळणाऱ्या एका मल्लाच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता हार्दिक जोशी आणि सालस शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री अक्षया देवधर यांनीही अवघ्या काही काळातच त्यांचा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं.

ही मालिका आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे, ते म्हणजे या मालिकेचं शीर्षकगीत. आनंदी जोशीने गायलेलं हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग झालं आहे. ‘रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा…’, असे बोल असणारं हे गाणं म्हणजे राणाचं अगदी हुबेहुब वर्णनच जणू. अंजली बाईंच्या दृष्टीकोनातून साकारण्यात आलेल्या या गाण्याची प्रेक्षकांवरील जादू ओसरत नाही तोच आता आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. रांगडा मर्द गडी राणा त्याच्या प्रेमाची कबुली कशा पद्धतीने देतो, हे या गाण्यातून पाहायला मिळत आहे. ‘रांगड्या जीवाला पिरमाचा तू आसरा…’, असे बोल असणाऱ्या गाण्याचा हा व्हिडिओ हार्दिक जोशी म्हणजे ‘राणा दा’ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राणा आणि अंजलीचं प्रेम आणि एकमेकांप्रती असणारी त्यांची ओढ पाहायला मिळत आहे. अथांग आभाळाखाली ऊसाच्या शेतात चित्रीत करण्यात आलेला राणा- अंजलीच्या प्रेमाचा हा नवा अध्याय प्रेक्षकांना भावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/BVzNpdqjhtn/

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमध्ये राणा आणि अंजलीच्या प्रेमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मुलींशी बोलताना घाबरणारा, मुलींची भिती वाटणारा राणा आणि त्याचा घाबरा स्वभाव सर्वांनाच माहित आहे. विशेष म्हणजे अंजलीशी लग्न झाल्यानंतरही त्याचा हा स्वभाव काही बदलला नव्हता. परंतु आता मात्र राणाचं एक नवं रोमँटीक रुप अंजलीला आणि प्रेक्षकांना पाहता येणार आहे. राणा आता बिनधास्त झालाय आणि तो आपलं प्रेम, आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करु लागला आहे. मुख्य म्हणजे त्याच्यातील या बदलाने अंजलीही भारावून गेलीये आणि तिलाही राणाची ओढ लागलीये हेच या गाण्यातून व्यक्त होत आहे. सुखदा भावेने शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं जितेंद्र तुपेने गायलं आहे.

वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

सध्याच्या घडीला या मालिकेचं कथानक पाहता सर्वांचा लाडका राणा दा, अंजली बाईंच्या सांगण्यावरुन आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करु पाहत आहे. पण, त्यांच्या या प्रवासात असणारे अडथळे काही केल्या कमीच होत नाहीयेत. या सर्व अडचणींवर मात करत आणि प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढत राणा- अंजलीची जोडी सध्या चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…