काही वर्षांपूर्वी बेस्टमध्ये चालू असलेल्या ‘उत्तम’ कारभाराची खूण असलेल्या बेस्टच्या अत्यंत भंगार अशा वातानुकुलित बसगाडय़ांना प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने त्या बंद कराव्यात, अशी मागणी बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी केली. बेस्टच्या वातानुकुलित बसगाडय़ांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या गाडय़ा मुंबईतील उड्डाणपूल चढताना मध्येच बंद पडतात. तसेच गाडीतील वातानुकुलन व्यवस्थाही खराब आहे. या गाडय़ा रस्त्यावर आल्या. दिवसाला एका गाडीमागे एक कोटीचा तोटा होत असल्यामुळे या गाडय़ा बंद करण्यात याव्यात, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली.

वातानुकुलित बससेवा चालवून बेस्ट हा तोटा वाढवत आहे. बेस्टच्या वातानुकुलित बसगाडय़ा भंगारात काढण्याच्या लायकीच्या आहेत. त्यातच काही महिन्यांपासून नवी मुंबई परिवहन सेवा आणि ठाणे महापालिका परिवहन सेवा यांनी अद्ययावत वातानुकुलित गाडय़ा घेतल्यानंतर त्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली.
मात्र बेस्टने नव्या गाडय़ा घेण्याऐवजी या जून्या गाडय़ाच चालवणे पसंत केले आहे. आपल्या खिशाला खड्डा पाडण्याऐवजी बेस्टने वातानुकुलित सेवा बंद करावी, अशी मागणी समिती सदस्य रवि राजा यांनी केली. या मागणीला पाठिंबा देताना शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनी ही मागणी आपण गेल्याच महिन्यात केल्याचे नमूद केले.
वातानुकुलित सेवा चालवणे ही बेस्टसाठी चैनीची बाब आहे. बेस्टकडे या चैनीसाठी पैसे नाहीत, असे सामंत यांनी अधोरेखित केले. मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी वातानुकुलित सेवा बंद करणे योग्य नाही. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असताना या मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या वातानुकुलित सेवेला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
वातानुकुलित सेवा बंद करण्याऐवजी त्यात काही सुधारणा करता येतील का, प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यास त्या कॉर्पोरेट क्षेत्रात भाडेतत्त्वावर देता येतील का, याची चाचपणी सुरू असल्याचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी या वेळी सांगितले.