वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना; पहिल्या टप्प्यासाठी २७ ठिकाणे
चांगले व प्रशस्त रस्ते झाले तरी जागोजागी टोलवसुलीचा जाच आणि पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या वाहनधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. टोलनाक्यांवर होणारी वाहनांची कोंडी फोडण्यासाठी आता राज्यातील सर्व टोलनाक्यांवर ई-टॅग या इलेट्रॉनिक्स पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २७ टोल नाक्यांवर या पद्धतीचा वापर करण्यात येणार असून त्यात मुंबई प्रवेश टोलनाके व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांचा समावेश आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.
या नव्या पद्धतीचा अभ्यास करून शासनास अहवाल देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर ई-टॅग पद्धतीच्या वापराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात खासगीकरणातून चार-सहा मार्गिकांचे प्रशस्त रस्ते झाले. मात्र त्यासाठी जागोजागी वाहनधारकांना टोल भरावा लागतो. निवडणुकांमध्ये भाजप व शिवसेनेने महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा केली असली, तरी ती प्रत्यक्ष अमलात आणणे आर्थिकदृष्टय़ा किती अवघड आहे, हे या पक्षांना सत्तेवर आल्यानंतर लक्षात आले आहे. तरीही काही टोलनाके बंद करून व काही टोलनाक्यांवर लहान वाहनांना सूट देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता टोलमुक्तीऐवजी टोल वसुलीचे सुलभीकरण करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

प्रत्येक टोल नाक्यावर टॅगची व्यवस्था
सध्याच्या पद्धतीनुसार टोलनाक्यावर वाहने थांबवून संगणावर नोंद करून पथकराची पावती दिली जाते. त्यासाठी काही वेळ टोलनाक्यावर थांबावे लागते. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या असतात. लोकांचा वेळ वाया जातो. टोलनाक्यांवरील ही वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता टोल भरणा करण्यासाठी ई-टॅग पद्धतीचा वापर करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. ठरावीक रक्कम भरून ई-टॅग घेणे व ते वाहनाला चिटकावयाचे आहे. प्रत्येक टोल नाक्यावर टॅग मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. टोल नाक्यावर वाहन आले की, टोलची रक्कम आपोआप वळती होणार आहे. वाहने टोलवाक्यावर थांबणार नाहीत. सध्या काही प्रमाणात मुंबई प्रवेश टोलनाक्यांवर अशा पद्धतीचा वापर केला जातो. त्यासाठी एक स्वंतत्र मार्गिका ठेवली जाते. परंतु त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे सर्वच टोलनाक्यांवर टोल भरणा करण्यासाठी ई-टॅगचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली.