भाजपपुढे आव्हान; काँग्रेसही सहानुभूतीपासून दूर
हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच उना अत्याचाराच्या घटनेचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. उना घटनेनंतर संघ परिवार विरुद्ध दलित असा थेट सामना सुरू झाला आहे. स्वातंत्र्यदिनी उना येथे झालेल्या विराट निषेध सभेने संघ परिवाराचाच अविभाज्य भाग असलेल्या भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. उना अत्याचाराबाबत संघटनात्मक पातळीवर मौन बाळगणाऱ्या काँग्रेसला दलितांची सहानुभूती मिळण्याची शक्यता कमीच आहे.
हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येला संघप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आंबेडकरवादी, डाव्या विद्यार्थी संघटनांमधील संघर्षांची पाश्र्वभूमी आहे. गुजरातमधील उना येथे मृत गायीचे कातडे काढणाऱ्या दलित तरुणांना गोरक्षकांनी अमानुष मारहाण केली. गोरक्षा हा संघाचा अजेंडा आहे. त्यामुळे उना येथील घटनेतही संघ परिवाराचा संबंध जोडला जात आहे. या दोन्ही घटनांचा निषेध करताना आंबेडकरवादी व डाव्या संघटनांकडून संघ परिवाराला लक्ष्य केले जात आहे. वेमुला व उना प्रकरणामुळे राज्यातील दलित समाजही अस्वस्थ आहे.
उना येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यात मुंबईतील गुजराती दलित समाज मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. मुंबईत गुजराती दलित समाजाची संख्या लक्षणीय आहे. उना घटनेमुळे हा समाजही अस्वस्थ आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मराठी व गुजराती दलित समाजाची नाराजी भाजपला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी दलित अत्याचाराच्या विरोधात उना येथेच मोठी निषेध सभा झाली. त्यातील मुस्लीम समाजाचा सहभागही लक्ष वेधून घेणारा होता. गुजरातमध्ये दलित-मुस्लीम ध्रुवीकरण भाजपसाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरणार आहे. उना घटनेबाबत काँग्रेसचे मौन अनाकलनीय मानले जाते. १९७७ मध्ये बिहारमधील बेलची दलित हत्याकांडाने सारा देश हादरला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी जीव धोक्यात घालून हत्तीवर बसून दुथडी वाहणारी नदी पार करून बेलचीला भेट दिली होती. त्यामुळे देशभरातील दलितांची कॉंग्रेसला सहानुभूती मिळाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला होता. उना घटनेबाबत काँग्रेस स्थितप्रज्ञ आहे. त्यामुळे दलित समाज भाजपवर नाराज असला तरी, काँग्रेसला त्याची सहानुभूती मिळण्याची शक्यता नाही.
हल्याप्रकरणी २२ अटकेत
उना शहरातील निषेध मेळाव्याला हजर राहून भावनगरला परतत असलेल्या दलितांवर आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे.समतेर गावात सोमवारी हा हल्ला झाला.
हिंदुत्ववादाची नखे जेवढी बाहेर येतील, तसे त्या विचाराला विरोध करणारे दलित व मुस्लीम एकत्र येतील, ही प्रक्रिया सुरू राहील. दलित-मुस्लीम समाजाचे ध्रुवीकरण भविष्यातील राजकारणावर परिणाम करणारे असेल, यात शंका नाही
-अब्दुल कादर मुकादम (समाजशास्त्रज्ञ)