राज्यभरात ‘लोकसत्ता लोकोंकिका’चे पडघम जोरात वाजू लागले आहेत. एकीकडे नाशिक, ठाणे, नगर आणि औरंगाबाद अशा चार शहरांमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक सलामी झाली असून तेथील तरूण नाटय़कर्मी विभागीय अंतिम फेरीच्या तयारीत आहेत. तर दुसरीक डे शनिवारी मुंबईसह पुणे आणि नागपूर येथे ‘लोकसत्ता लोकांकिका’चा पहिला अंक होईल. देशभरात निश्चलीकरणामुळे सुरू असलेला गोंधळ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा राज्यभर उठलेला धुरळा, परीक्षांचा ताण आदी गोष्टी बाजूला सारून आपली सर्जनशीलता एकांकिकांच्या माध्यमातून पणाला लावणाऱ्या तरूणाईचा जोश या तिन्ही शहरांतून रंगणाऱ्या प्राथमिक फेरीत पहायला मिळणार आहे.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ची प्राथमिक फेरी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे शनिवार-रविवार दोन दिवस रंगणार आहे. मुंबईत रवींद्र नाटय़मंदिर येथे पहिल्या दिवशी आठ महाविद्यालये प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. चेंबूरचे एन. जी. आचार्य महाविद्यालय, चर्चगेटचे किशनचंद चेलाराम महाविद्यालय, ताडदेव येथील एनएसएस कॉलेज ऑफ कॉमर्स, सिध्दार्थ महाविद्यालय, बोरीवलीतील सायली कॉलेज, भवन्स कॉलेज, गोरेगावचे विवेक कॉलेज ऑफ कॉमर्स आणि दादरच्या किर्ती महाविद्यालयातील नाटय़वेडे उद्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रंगमंचावर प्राथमिक फेरीत आपला नाटय़विष्कार सादर करतील. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असणाऱ्या ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या वतीने रागिणी चुरी, अभिनेत्री शुभदा गोडबोले, अभिनेता श्रीरंग देशमुख आणि नाटय़कर्मी दीपक करंजीकर यांची प्राथमिक फेरीसाठी खास उपस्थिती असणार आहे.

पुण्यात नूतन मराठी विद्यालय मुलींची शाळा येथे ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फे रीला सुरूवात होणार असून पाच महाविद्यालये पहिल्या दिवशी आपल्या एकांकिका सादर करतील. यावेळी तिथे नाट्यदिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी आणि दिग्दर्शक कार्तिक केंढे हे या तरूणांच्या नाटय़गुणांना पारखण्याचे काम करणार आहेत. तर नागपूरमध्येही विनोबा विचार केंद्रात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ ज्येष्ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी १३ महाविद्यालये सहभागी होणार असून प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक-अभिनेते अभिजीत गुरू आणि समिधा गुरू यांची आयरिसच्या वतीने उपस्थिती असणार आहे. गेली तीन वष्रे ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने आठ केंद्रांवर तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या या स्पध्रेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.