‘‘सर्वोत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळवायचे असेल तर प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत, संतुलित आणि प्रमाणित आहार घेतला पाहिजे, त्याशिवाय मन:शांती मिळविणेही गरजेचे आहे,’’ असा सूर ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात उमटला. दोन दिवस सुरू असलेल्या या परिसंवाद आणि प्रदर्शनाची अखेर रविवारी झाली. भरघोस प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात वाचकांच्या प्रश्नाला खुमासदार आणि आरोग्यदायी उत्तरे देत तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या शंकांचे निरासन केले.
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी ‘सामान्य आरोग्य’ या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.
मानसिक आरोग्याशिवाय निरामय आरोग्याची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. आयुष्यातील लहानसान आनंदावर मानसिक आरोग्य अवलंबून असते. एकाच प्रकारच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्या १० रुग्णांकडून सारख्याच उपचारांना मिळणारा प्रतिसाद भिन्न स्वरूपाचा असतो. कारण त्याच्या मनाच्या अवस्थेवर त्याचे बरे होणे अवलंबून असते. म्हणूनच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी केले.
आधुनिक जीवनप्रणालीनुसार आपण आहारात बदल केले. मात्र त्याबरोबर आपण अशुद्ध आणि अपायकारक आहार खात असल्याचे कुणाच्याही लक्षात येत नाही. पूर्वीच्या काळी लोक दीर्घकाळ जगत, कारण ते योग्य आहार घेत असत. आपल्या पणजी-पणजोबांनी जो आहार घेतला, तोच घेणे आवश्यक आहे. त्या वेळी संकरित केलेले अन्न किंवा फास्ट फूड खात नसत. पचण्यास सोपे आणि शरीरास उपायकारक असणारा आहार करत असत. आताही तोच कित्ता गिरविणे गरजेचे आहे, अशी माहिती आहारतज्ज्ञ वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांनी दिली. परिसंवादाचे सूत्रसंचालन लोकसत्ता प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी केले.