राज्यातील टोलनाक्यांवर होणाऱ्या वाहनचालकांच्या लुटीविरोधात वाढत असलेला संताप लक्षात घेऊन २०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे प्रकल्प राज्य सरकारच्याच माध्यमातून करून ते रस्ते टोलमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला. त्याचप्रमाणे दोन टोलनाक्यांमधील अंतरही ३० किमीऐवजी ४५ किमी करण्याचे राज्याच्या नव्या टोलधोरणात जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हे टोलधोरण यापुढे निर्माण करण्यात येणाऱ्या रस्त्यांवरच लागू राहणार असल्याने सध्या सुरू असलेली ‘टोलधाड’ कायम राहणार आहे.  
टोलच्या विरोधात जनतेत निर्माण झालेला आक्रोश, यावरून तापलेले राजकीय वातावरण आणि आगामी विधानसभा निवडणूक या पाश्र्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी नव्या टोलधोरणास मंजुरी दिली. त्यानुसार राज्य सरकारमार्फत अर्थसंकल्पातून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना टोलमधून वगळण्यात आले आहे. याशिवाय या टोलधोरणात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जनतेला टोललुटीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
परंतु, हे टोलधोरण भविष्यातील रस्तेप्रकल्पांबाबतच राबवण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेल्या कोणत्याही रस्त्यांवरील टोलचा भुर्दंड कमी झालेला नाही. काही रस्त्यांवरील खर्च केव्हाच वसूल झाला आहे. तरीही ठेकेदाराचे बँकेचे हफ्ते फेडण्याकरिता नागरिकांच्या माथी टोल कायम ठेवण्यात आला आहे. टोल नाके बंद केल्यास द्यावी लागणारी नुकसानभरपाईची रक्कम लक्षात घेता सरकारने ठेकेदारांची दादागिरी आणि मनमानी सुरू ठेवण्यावरच भर दिला.

टोलधोरणातील तरतुदी
* टोलनाक्यांमधील अंतर ३०वरून ४५ किमीवर. दोन वेगवेगळय़ा रस्त्यांवरील टोलमध्येही २० किमीचे अंतर.
* एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना टोलमाफी. टोलचे दर प्रकल्प किमतीऐवजी किलोमीटर तत्वावर.
* दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या वळण रस्त्यावर रस्त्याच्या दराच्या दीड पट.
* वळण रस्त्याची किंमत दहा कोटी रुपयांपेक्षा जादा असल्यास रस्त्याच्या दराच्या दीड पट एवढे पथकर शुल्क असेल तर  द्रुतगती महामार्गासाठीचे पथकर शुल्क सव्वा पट.
* दुपदरीकरण करावयाच्या
रस्त्यासाठी पथकराचे दर चौपदरी रस्त्याच्या ६० टक्के.
* एखाद्या रस्त्याच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी सलग सहा महिने त्यावरील वाहतुकीचे  डिजिटल पध्दतीने सर्वेक्षण.
* नवीन प्रकल्पाकरीता टोलनाक्यांवर वाहतूकदारांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा.

पासधारकांना सवलती..
५० किंवा १०० कूपन्सच्या पुस्तिकेची आगाऊ
खरेदी करणाऱ्यांस एकूण शुल्कातून अनुक्रमे १० व २० टक्के सवलत.
परतीच्या व दैनंदिन पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या अनुक्रमे दीडपट व अडीच पट. मासिक पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या ५० पट.
मासिक पासाची सवलत स्थानिक वाहतुकीसाठी पथकर स्थानकांपासून ५ कि.मी.च्या परिघातील वाहनांना  देण्यात येईल व या पासाचा दर त्या वाहनाच्या एकेरी प्रवास दराच्या १० पट असेल.