गणपतीपुळेजवळ असलेल्या कवी केशवसुत यांच्या मालगुंड आणि महाबळेश्वर-वाईजवळ असलेल्या भिलार या दोन गावी लवकरच ‘पुस्तकांचे गाव’ उभे राहणार आहे. ‘पुस्तकांच्या गावा’साठी ही दोन्ही गावे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या संदर्भातील सर्वेक्षण आणि आराखडा लवकरच सादर केला जाणार असून त्यानंतर लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे. दोन्ही गावांमधील शंभर घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवण्यात येणार असून सुट्टीच्या कालावधीत साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘पुस्तकांचे गाव’ ही मूळ संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची असून राज्य ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी ‘पुस्तकांचे गाव’ उभारण्याची घोषणा केली होती. या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना तावडे म्हणाले, मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेला तर भीलार येथे मराठी भाषा विभागाला सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्यास सांगितला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होऊन लवकरच दोन्ही ठिकाणी ‘पुस्तकांचे गाव’ उभे राहील. महाबळेश्वर आणि गणपतीपुळे येथे पर्यटक मोठय़ा प्रमाणात जातात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पुस्तकांचे गाव उभारणे अधिक योग्य आहे.
तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले, ‘कोमसाप’ने मालगुंड येथे कवी केशवसुत यांचे स्मारक उभारले असून वर्षभरात येथे ५५ हजार पर्यटक भेट देत असतात. मालगुंड येथील पुस्तकांच्या गावासाठी समन्वयक म्हणून काम कराल का? अशी विचारणा मराठी भाषा विभागाने ‘कोमसाप’ला केली असून त्यांना आम्ही आमचा होकार कळविला आहे.
मालगुंड, गणपतीपुळे ग्रामपंचायत, कवी केशवसुत स्मारक, परिसरातील शाळा, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ या सगळ्यांच्या प्रतिनिधींची बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार असून त्यात या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन्ही गावांत दिवाळी, नाताळ आणि मे महिन्यांच्या सुट्टीत साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित केले जातील. साहित्यिक प्रकट मुलाखत, साहित्यिक आणि वाचक थेट संवाद, चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन असे विविध कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जाणार आहेत.
– विनोद तावडे , सांस्कृतिक कार्यमंत्री