‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे दोन दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर पुनर्मुद्रित
इतिहास, गूढ आणि अफवा यांत लपेटलेल्या मस्तानी या व्यक्तिरेखेचे अस्सल व संशोधननिष्ठ रूप उलघडून दाखवणारे द.ग. गोडसे यांचे ‘मस्तानी’ हे गाजलेले पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती पडणार आहे. मिथक आणि वास्तव यांची उत्तम सांगड घालणारे हे पावणेतीनशे पानी पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे दोन दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर पुनर्मुद्रित होत आहे.
मस्तानी हे पेशव्यांच्या काळातले एक गूढ व्यक्तिमत्त्व. ‘मस्तानी’ या पुस्तकात द.ग. गोडसे यांनी संशोधनात्मक दृष्टिकोनातून मस्तानीचा संमग्र वेध घेतला आहे. पेशवेकालीन मराठी दप्तराचे पद्धतशीर संशोधन न झाल्यामुळे मस्तानीच्या पूर्वचरित्राबाबत अनेक कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या. त्यातून मार्ग काढत गोडसे यांनी अनेक सरदारांच्या बखरी, कैफियती आणि सरदार-सरंजामदारांच्या खासगी दप्तरातून मिळेल तशी माहिती धुंडाळली आणि ‘मस्तानी’ हा अनमोल ग्रंथ लिहिला.
आपल्या ‘मस्तानी’विषयक संशोधनाचा वृत्तांत गोडसे यांनी लिहिला आहे. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात, ‘ .. मस्तानीचा एवढा द्वेष का करण्यात आला? ती अनौरस आणि अंशत: मुसलमान समजली गेली म्हणून? पहिली पत्नी काशीबाई हयात असताना बाजीरावाने मस्तानीचा स्वीकार केला एवढय़ामुळे त्या काळी तो किती अपराधी ठरतो? .. बाजीरावाच्या वडिलांचेही अंगवस्त्र होते.
मग तेही अपराधी का नाहीत? आई राधाबाई हिने एवढी खळबळ का करावी? स्वत:च्या नवऱ्याच्या बाबतीत ती गप्प का बसली? मस्तानी घरंदाज, सुसंस्कृत होती म्हणूनच तर तिला विरोध नव्हता? तिची सहिष्णू, निधर्मी वागणूक तर पेशव्यांच्या सनातन कर्मठ कुटुंबाला खुपत नव्हती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न गोडसे यांनी मस्तानी पुस्तकात केला आहे.
याशिवाय बाजीराव घरच्या लोकांसमोर गोगलगाय का बनतो? या लोकांपासून तो मस्तानीला संरक्षण का देऊ शकत नाही? मस्तानी ही खानदानी कुळातली नव्हती तर तिच्या मरणोत्तर तिच्या मुलाला वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सरदारकी का देण्यात आली? आणि ही सरदारकी पेशवाईअखेर आणि नंतरही मस्तानीच्या वंशातच का राहिली? अशा अनेक प्रश्नांची चर्चा पुस्तकात झाली आहे. त्यामुळे हे पुस्तक अमूल्य ठरते, असे पॉप्युलर प्रकाशनच्या वतीने सांगण्यात आले.
पन्नास ते सत्तर या दोन दशकांत द.ग. गोडसे यांचे कर्तृत्व बहरले. ख्यातनाम कलासमीक्षक आणि चित्रकार म्हणून ते मान्यता पावले. शंभराहून अधिक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्य केले. पुस्तकांचे मुखपृष्ठ ही गोडसे यांची खासियत ठरली. ‘पोत’ या पुस्तकाद्वारे गोडसे यांनी आपला सौष्ठवविचार मराठी वाचकांसमोर मांडला.

मस्तानीविषयी बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. गोडसे यांच्या संशोधनपूर्वक लिखाणामुळे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर आणि चौरस होईल. आणि या कामी या अभिजात श्रेष्ठ साहित्यकृतीची मदत होईल अशी आशा वाटते.
– अस्मिता मोहिते, पॉप्युलर प्रकाशन