राजस्थानातून परतीचा प्रवास लवकरच; राज्यात मध्यम पावसाची शक्यता

गेल्या तीन महिन्यांपासून सतत हुलकावणी देत असलेला मान्सून निदान सप्टेंबरमध्ये तरी कसर भरून काढेल, अशी आशा असताना तीही फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरअखेपर्यंत राजस्थानात रेंगाळणारा मान्सून यंदा पहिल्याच आठवडय़ात तेथून माघार घेणार असल्याचा अंदाज आहे. परिणामी राज्यातूनही मान्सून लवकरच काढता पाय घेण्याची शक्यता आहे. तरीही बंगालच्या उपसागरातील एकूण परिस्थितीमुळे १० सप्टेंबरनंतर मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची आशा आहे.
जूनच्या विक्रमी पावसानंतर आस लावून ठेवलेल्या पावसाने जुलै आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्राची साफ निराशा केली. मान्सूनच्या ८० टक्के पावसाचे तीन महिने निघून गेल्यानंतर उरलेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत थोडीफार अपेक्षा होती. मात्र, आता तीदेखील विरताना दिसत आहे. राजस्थानमध्ये रविवारपासून हवा कोरडी होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनचे माघारी परतण्याचे निकष पाहता कदाचित ही तारीख पुढच्या आठवडय़ात वेधशाळेकडून जाहीर केली जाऊ शकते. मात्र, तरीही वेळेआधी मान्सून परतणार, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. राजस्थानातून परतीच्या प्रवासाला लागलेला मान्सून साधारणत महिनाभर राज्यात रेंगाळतो. तसेच बंगालच्या उपसागरात याचवेळी कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्वेकडील मान्सूनचे वारे राज्यात जाता जाता पाऊस आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे १० सप्टेंबरनंतर मध्य महाराष्ट्र व मराठवाय़ात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. परंतु तोपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असेल, असे वेधशाळेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मान्सून माघारी फिरण्याचे निकष : १ सप्टेंबरनंतर देशाच्या वायव्य भागात सलग पाच दिवस पावसाची नोंद झालेली नाही; तसेच या परिसरातील हवेच्या खालच्या स्तरातील वारे प्रतिचक्रीवात पद्धतीने (चक्रीवादळाच्या विरुद्ध स्थिती) फिरत असल्यास मान्सून माघारी फिरल्याचे जाहीर केले जाते.

काही वेळा हवा कोरडी झाली तरी पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असते. हिमालयाच्या पायथ्याशी असलेला कमी दाबाचा पट्टा आणखी दक्षिणेकडे सरकला तर काही काळ पाऊस रेंगाळेल. मात्र एकूण स्थितीवरून मान्सून वेळेआधीच माघार घेण्याची शक्यता आहे.
कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई हवामानशास्त्र विभाग

मान्सून माघारी फिरल्याचे दिवस
19