मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. ४७७ पैकी ४६९ परीक्षांचे निकाल यापूर्वीच जाहीर झाले होते. तर वाणिज्य शाखेतील महत्त्वाच्या आठ परीक्षांचे निकाल जाहीर झाले नव्हते. मंगळवारी या परीक्षांचे निकाल जाहीर आले आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या घोळामुळे यंदा मुंबई विद्यापीठाच्या निकालाला विलंब झाला. निकाल रखडल्याने पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया बराच काळ रखडली होती. याविरोधात मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल झाली होती. हायकोर्टात विद्यापीठाने डेडलाईनदेखील दिली. मात्र याचे पालन करण्यात विद्यापीठाला अपयश येत होते. मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा सावळागोंधळ मागील तीन महिन्यांपासून सुरू होता. १९ सप्टेंबपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे आश्वासन विद्यापीठाने हायकोर्टात दिले होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी विद्यापीठाने उर्वरित आठ परीक्षांचे निकाल जाहीर केले.

निकाल जाहीर झाले असले तरी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया हे आव्हानही विद्यापीठासमोर आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी ३३ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून छायांकित प्रतीसाठी ६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे आता पुनर्मूल्यांकनासाठी किती वेळ लागणार हे अद्याप समजू शकलेले नाही.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या गोंधळामध्ये २६०० उत्तरपत्रिकांची इतर विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये सरमिसळ झाली. त्यापैकी ९०० उत्तरपत्रिकांचा शोध लागला असून उर्वरित १७०० उत्तरपत्रिकांची शोधमोहीम सध्या विद्यापीठात सुरू आहे. मेरिट ट्रॅक कंपनीने या उत्तरपत्रिकांचा ताबा घेतला आणि स्कॅनिंगची प्रक्रिया सुरू केली. लाखो उत्तरपत्रिकांचे गठ्ठे हाताळण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने स्कॅनिंगसाठी गठ्ठे उघडताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून उत्तरपत्रिका हरवल्या असे समजते.