‘लोकसत्ता ९९९’ला उदंड प्रतिसाद

स्थानिक महिलांनी सादर केलेली मंगळागौर, पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या महिला, खुमासदार सूत्रसंचालन आणि आबालवृद्धांचा सहभाग या साऱ्यांनी ‘लोकसत्ता ९९९’ नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. ‘रामबंधू चिवडा मसाला’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’ अंतर्गत गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा वसाहत क्रमांक ८ येथे झालेल्या या कार्यक्रमात गोरेगावकर पुरते दंगून गेले होते.

मंगळागौर, पारंपरिक खेळ आणि दिवाळी फराळाची स्पर्धा घेऊन आलेल्या ‘लोकसत्ता ९९९’चे कार्यक्रम मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील निवडक नवरात्र मंडळांच्या ठिकाणी होत आहेत. यातील पहिल्या दिवशी गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा वसाहत क्रमांक ८ येथे हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालक स्मिता गवाणकर, कुणाल रेगे यांनी स्थानिकांच्या रंगात रंगून कार्यक्रम खुलवत नेला. त्यांनी प्रथम प्रश्नोत्तरांच्या खेळात लाजऱ्याबुजऱ्या महिलांना स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन करत बोलते केले. यात अंकिता शिंदे यांनी पहिले बक्षीस पटकावले. तर गौरी साळवी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. सविता राऊत व ऋतुजा राऊत या आजी-नातीच्या जोडीने भक्तीपर गाणे म्हणत बक्षीस जिंकले. तर ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ हे गाणे वेगळ्या पद्धतीने सादर करत चार वर्षीय त्रिशा जोशीने गंमत उडवून दिली.

दिवाळीचे तिखट पदार्थ बनविण्याची स्पर्धा या वेळी घेण्यात आली. यात मक्याचा चिवडा बनवणाऱ्या साधना राऊत या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. चकली, शंकरपाळी, लाडू, करंजी तयार करणाऱ्या प्रतिभा आचरेकर द्वितीय तर लाडूसाठी नेहा पेडणेकर यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांना अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि ‘रामबंधू मसाला’चे भानुदास गुंडकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. ‘नऊ दिवस नवरात्रोत्सवापुरता महिलांचा सन्मान न करता वर्षांचे ३६५ दिवस करावा. घरच्या स्वयंपाकाला दाद मिळाली तरीही महिलांचा उत्साह द्विगुणित होतो,’ असे वेलणकर यांनी सांगितले.

महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत नेहा पेडणेकर, दक्षा सुतार यांनी बक्षिसे पटकावली. हार, अंगठी, पैजण खेळात सहभागी जोडप्यांनी उखाणे घेत एकच धमाल उडवून दिली. यात नेहा आणि नीलेश पेडणेकर या जोडीने प्रथम पारितोषिक तर भक्ती व परशुराम राऊत या जोडीने द्वितीय पारितोषिक जिंकले. या खेळादरम्यान स्थानिक तरुण कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दाद दिली. तसेच, साक्षी वागरे आणि मिलिंद साप्ते यांनीही विविध पारितोषिके पटकावली. विजया कुळेकर, साक्षी नाईक, ऐश्वर्या निवेकर, नीलेश सुखदरे हे ‘लोकसत्ता लकी ड्रॉ’चे मानकरी ठरले. कार्यक्रमाला केसरीचे प्रमोद दळवी यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे आयोजन ‘जीवनगाणी’तर्फे करण्यात आले होते. समारोपाच्या वेळेस नागरी निवारा वसाहत विभाग क्रमांक ७ उत्सव मंडळाला लोकसत्ताच्या वतीने ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

आज भायखळय़ात उत्सव

‘लोकसत्ता ९९९’ ही स्पर्धा शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, बकरी अड्डा, आर्थर रोड, भायखळा येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री मधुरा वेलणकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘ड्राय डे’ या चित्रपटातील ऋत्विक केंद्रे, मोनालिसा बागल, योगेश सोहोनी, कैलास वाघमारे, पार्थ घाटगे, चिन्मय काबंळी आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत.

प्रायोजक : रामबंधू चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’चे सहप्रायोजक केसरी व बँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड हे आहेत. पॉवर्डबाय प्रायोजक एम. के. घारे ज्वेलर्स आहेत.