बाळासाहेब ठाकरे अकादमीचा उपक्रम

राज्य शासनाच्या सनदी अधिकारी प्रशिक्षण केंद्राची एकीकडे दुरवस्था असताना दुसरीकडे शिवसेनेच्या ‘बाळासाहेब ठाकरे आएयएस अकादमी’ने शहरी भागासह ग्रामीण भागातून अधिकाधिक तरुणांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उतरावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत. गेली दोन वर्षे निवड करून राज्यातील एक हजार तरुणांना या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आगामी वर्षांसाठी राज्यातील २५ जिल्ह्य़ांमधील ‘बाळासाहेब ठाकरे आयएसएस अकादमी’तून एक हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्याबरोबर राज्यातून जे तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून गेल्या वर्षी युपीएससी परीक्षेत निवड झालेल्या ५५ गुणवंतांचा सत्कार येत्या रविवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे या अकादमीचे संचालक व शिवसेना उपनेते विजय कदम यांनी सांगितले. मुंबई जिल्हाधिकारी अश्विनी जोशी या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करणार असून गृहराज्यमंत्री दिपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेली १६ वर्षे महाराष्ट्रातून या केंद्रीय परीक्षेत यशस्वी होणाऱ्या गुणवंतांचा सत्कार अकादमीतर्फे करण्यात येत असून गेली चार वर्षे युपीएससी परीक्षेसाठी कसून तयारी करून घेणारे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या या अकादमीतून आतापर्यंत अनेकांची युपीएससी परीक्षेत निवड झाली असून २०१५ मध्ये श्रीकृष्ण पांचाळ यांची या परीक्षेत १६ क्रमांक मिळवून आएएएससाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे योगेश कुंभेजकर यांची आयपीएससाठी निवड झाली असून अकादमीचा विद्यार्थी देशात या परीक्षेत सर्वप्रथम यावा यासाठी यंदा आमचे प्रयत्न राहणार असल्याचे विजय कदम यांनी सांगितले. राज्यातील २५ जिल्ह्य़ांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाते. आगामी काळात राज्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड व्हावी यासाठी यंदा विशेष प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.