माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची नवी भूमिका

स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडल्यानंतरही भाजपाने राज्य निर्मितीबद्दल वेळकाढू धोरण अंगिकारल्याने माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना चळवळीने विदर्भाचे स्वप्न साकार होणार नसल्याची प्रचिती आली आहे. त्यासाठी सक्षम राजकीय पर्याय उभा करावा लागेल, अशी नवीन भूमिका त्यांनी मांडली आहे.

लोकनायक बापूजी अणे आणि विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या चळवळीचे काय झाले, असा सवाल करून केवळ चळवळीतून विदर्भ राज्य कधीच होणे शक्य नाही. चळवळी दडपल्या जातात. भाजप आणि काँग्रेसला सशक्त राजकीय पर्याय द्यावा लागेल. मतपत्रिकेतून ताकद दाखवावी लागेल. निवडणुका लढव्याव्या लागतील. त्यासाठी गावागावात जाऊन सभा घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार ट्रस्टच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.  भारताचा इतिहास शोधल्यास चळवळीतून राज्य मिळाल्याचे सापडणार नाही. चळवळीमुळे विदर्भ राज्य व्हायचे असते, तर बापूजी अणे आणि धोटे यांच्या काळात झाले असते. संविधानातील तरतुदीचे पालन करून विदर्भ राज्य करता येऊ शकते. मात्र, भाजप ते करत नाही. योग्य वेळी करू, असे ते सांगतात, पण ती योग्य वेळ केव्हा येणार, असा सवाल करून भाजपच्या विश्वासाहर्तेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.