भविष्यातील पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे सांगत नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला त्याला उद्या आठवडा होत असला तरी या राजीनाम्याबाबत काँग्रेस पक्षाने अद्याप काही निर्णयच घेतलेला नाही. काही तरी व्यवहार्य तोडगा निघावा म्हणून राणे यांनी काँग्रेस नेत्यांच्या या काळात गाठीभेटीही घेऊन एक पाऊल मागे टाकले. आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालणाऱ्या राणे यांच्यासाठी सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी वेळ आली आहे.
मोठा गाजावाजा करीत राणे यांनी गेल्या सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. आता माघार नाही, अशी घोषणा राजीनामा सादर करण्यापूर्वी राणे यांनी केली होती. पण राजीनामा सादर केल्यापासून राणे यांनी दमाने घेतले आहे. राजीनाम्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी राणे यांनी दाखविली. यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, पण त्यातूनही राणे यांचे समाधान झाले नाही. तीन दिवसांपूर्वी राणे यांनी नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून या वादावर पडदा पाडण्याची राणे यांची इच्छा आहे. सोनियांच्या भेटीची सध्या तरी राणे यांना प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागत राणे यांनी राजीनामा सादर केला. त्याच मुख्यमंत्र्यांची राणे यांनी भेट घेऊन चर्चा केली, त्यावरूनच राणे राजीनाम्याबाबत किती गंभीर आहेत हे स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका बडय़ा नेत्याने व्यक्त केली.
तोडगा काय निघणार ?
निवडणुकीच्या तोंडावर राणे यांच्यासारखा आक्रमक नेता दुरावून चालणार नाही, अशी काँग्रेस नेत्यांची भावना आहे. मुख्यमंत्री चव्हाण हे राणे यांची मनधरणी करण्याच्या विरोधात असले तरी पक्षाने राणे यांना एकदमच दुर्लक्षित केलेले नाही. आपल्याला प्रदेशाध्यक्षपद किंवा महत्त्वाचे खाते मिळावे, अशी इच्छा राणे यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीसाठी प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्याची पक्षाची योजना असली तरी या पदासाठी राणे फार काही उत्साही नाहीत. येत्या दोन-तीन दिवसांत काही तरी तोडगा निघेल, असा विश्वास काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.