मेडिकल, मेयोची सुरक्षा आता पोलिसांच्या ताब्यात

निवासी डॉक्टरांच्या आंदोलनकाळात शहरात ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मेडिकल व मेयोची सुरक्षा यंत्रणा आता पोलिसांकडे देण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांनी पाच दिवस केलेल्या सामूहिक रजा आंदोलनामुळे दोन्ही रुग्णालयांतील नवीन दाखल रुग्णांच्या प्रवेशाची संख्या पन्नास टक्के रोडावली, मात्र मृत्यूचा टक्का वाढला. विलंबानेच का होईना निवासी डॉक्टरांनी शनिवारी सकाळी ७.३० वाजता स्टेथोस्कोप हाती घेऊन सेवा सुरू केली. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असला तरी वाढलेल्या मृत्यूंना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यातील धुळे, मुंबई, नाशिक, औरंगाबादसह इतर काही भागात गेल्या काही दिवसात निवासी डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटना घडल्या. त्याचा निषेध करण्यासह सुरक्षेच्या मागण्यांकरिता नागपूरच्या मेडिकल, मेयोतील

४४० निवासी डॉक्टरांनी २० मार्चच्या सकाळी ८ वाजतापासून अचानक सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. यामुळे दोन्ही संस्थेतील आरोग्य यंत्रणाच कोलमडली. दोन्ही संस्थेतील प्राध्यापक ते वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी २४ तास क्षमतेहून जास्त सेवा दिल्याने रुग्णांना आंशिक दिलासा मिळाला. परंतु निवासी डॉक्टरांच्या तुटवडय़ामुळे वॉर्डात डॉक्टर कमी पडल्याने कमी गंभीर गटातील रुग्णांना सुटी देण्यासह दाखल असलेल्या रुग्णांचे हाल झाले.

मेडिकलमध्ये सोमवारी सकाळी ८ ते शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आंदोलन काळात ५१ मृत्यू नोंदवण्यात आले. मेडिकलला प्रवेश होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा टक्का जास्त असल्याचे दिसत आहे. मेयोत या काळात नोंदवलेले १० मृत्यू नेहमीहून कमी असले तरी येथे नोंदवलेल्या नवीन रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा टक्का जास्त आहे.रुग्णांना चांगल्या सेवा दिल्या असून मृत्यूचा टक्का नेहमीप्रमाणेच असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान निवासी डॉक्टरांना शासनाकडून मिळालेल्या आश्वासनानुसार शनिवारी शहर पोलिसांनी मेडिकल व मेयोतील बाह्य़रुग्ण, अतिदक्षता या विभागांसह अकस्मात व जास्त गर्दीच्या विभागांत शस्त्रधारी पोलीस २४ तास उपलब्ध केले.

येथील सुरक्षेचे अंकेक्षण शहर पोलिसांच्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करून सर्वत्र फिरत्या पोलीस पथकाकडून सुरक्षा वाढवण्यात आली. याकरिता राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेतली आहे.

रुग्णालयांत पासशिवाय नातेवाईकांना प्रतिबंध

मेडिकल, मेयोसह त्यांच्या आखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांत आता रुग्णांच्या नातेवाईकांना पासशिवाय प्रवेश राहणार नाही. प्रती रुग्ण दोघांना प्रवेश राहणार असून चार ते सहाच्या कालावधीत एका नातेवाईकाला प्रवेश असेल. दोन्ही संस्थेतील नातेवाईकांना देण्याकरिता रंगीत पास तयार करण्याचे काम संबंधितांना दिले आहे. मेडिकलमधील पासवर नातेवाईकांचे छायाचित्रही राहणार असून येथे वार्डात थांबणाऱ्या नातेवाईकाकडे हिरवे तर भेटणाऱ्यांना लाल पास दिले जातील. मेडिकलमध्ये सध्या १८ बंदुकधारी, टीबी वॉर्ड परिसरात पोलीस चौकी व तेथे सात पोलीस ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे.