मौद्या तालुक्यातील चिचोलीत प्रयोग

नोटबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोखरहित विक्रीवर अधिक भर देण्याचे आवाहन देशवासींना करून सरकारी पातळीवरही हा प्रयोग प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. नागपूर जिल्ह्य़ातील चिचोली (मौदा) येथील स्वस्त धान्य दुकानातील विक्री आता रोखरहित पद्धतीने सुरू झाली आहे. जिल्ह्य़ातील इतर तीन दुकानांमध्ये ‘पीओएस’ यंत्र पुरवठा विभागाकडून उपलब्ध करून दिले आहे.

पीओएस यंत्राच्या माध्यमातून सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य विक्री करण्याची तयारी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी काही दिवसांपासून सुरू केली होती. जिल्ह्य़ातील पहिली पीओएस मशिन चिंचोली येथील स्वस्त धान्य दुकानचालकाकडे लावण्यात आली. १४ जानेवारीला संक्रातीच्या मुहूर्तावर हा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्ह्य़ात चार स्वस्त धान्य दुकानात अशा प्रकारच्या मशिन्स लावण्यात आल्या आहेत. याच माध्यमातून आता शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाणार आहे. ग्राहकांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असेल, तर पीओएस यंत्राच्या माध्यमातून रोखरहित पद्धतीने तो स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करू शकतो. स्वस्त धान्य दुकानातील व्यवहारांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात गतीने या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.