रुग्णालयात जखमींची विचारपूस

नितिका फार्मा कंपनीत लागलेल्या भीषण आगीतील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी २ वाजता रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. रुग्णांना राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत देऊन या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिले. मुख्यमंत्री सुमारे २० मिनिटे रुग्णालयात होते. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. याप्रसंगी कामगारमंत्री शिवाजी निलंगेकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जखमी झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. ही दुर्घटना मनाला वेदना देणारी असल्याचे मत कामगारमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केले. यापुढे अशा घटना घडू नयेत, म्हणून शासनाकडून योग्य त्या उपाययोजना राज्यभरात हाती घेण्यात येतील, या प्रकरणात नेमके काय घडले, याचाही शोध घेण्याची गरज त्यांनी विषद केली. याप्रसंगी ऑरेंज सिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी नेत्यांना रुग्णांची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.

रुग्णांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेणार

रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी धीर देत उपचाराची जबाबदारी शासनाची असून या प्रकरणातील दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. सोबत रुग्णांच्या पुनर्वसनाचीही जबाबदारी शासन घेणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी नातेवाईकांना दिले.

कंपन्यांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना

नागपूर जिल्ह्य़ातील कंपन्यांची तपासणी करण्यासाठी अपर कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कंपन्यांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. दर आठवडय़ात एका कंपनीला भेट द्या, कामगारांशी संवाद साधून अहवाल सादर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

‘नितिका’ अग्निकांडात आणखी एक मृतदेह

नागपूर : नितिका फार्मा या पिवळी नदी परिसरातील कंपनीत झालेल्या ब्लास्ट प्रकरणातील मृतकांची संख्या २ झाली आहे. कंपनीतील मलब्याच्या खाली पांडुरंग उर्फ शंकर कांद्रीकर (३०, पवननगर, कळमना) याचा मृतदेह आढळून आला.

औषध निर्मित करणाऱ्या नितिका कंपनीत शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास दोन बॉयलरचा स्फोट झाला. त्यात एकूण २५ कामगार जखमी झाले होते. तर एक जण बेपत्ता होता. जखमी कामगारांवर मेयो आणि ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता ८२ टक्के भाजलेल्या संदीप पनकुले या कामगाराचा मृत्यू झाला होता. मात्र, पांडुरंग हा कामगार रुग्णालयात किंवा कंपनीतही कोणाला दिसला नाही. त्यामुळे तो ब्लास्टमध्ये जखमी होऊन मरण पावल्याचा संशय पोलिसांना होता. त्याचा शोध पोलीस घेत असताच आज रविवारी दुपारी इमारतीच्या मलब्याखाली पांडुरंग यांचा मृतदेह आढळला. पांडुरंग यांच्या अंगावरील कातडी संपूर्ण गळलेली होती. केवळ सांगाडा सापडल्यामुळे तो सांगाळा पांडुरंगचाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली.