नागपूर विमानतळ विकासाला मंत्रिमंडळाची मान्यता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळ व कार्गो हबच्या अत्याधुनिक बांधकामाला राज्य शासनाने मान्यता दिली असून यामध्ये अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल आणि नवीन धावपट्टी तयार केली जाणार आहे. त्याचसोबतनिर्यातीसाठी शीतगृहाची आवश्यकता लक्षात घेऊन तेथे लॉजेस्टिक पार्क उभा केला जाईल. यामुळे देशातील मोठय़ा उद्योग समूहांकडून निर्यातीसाठी मिहानला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात कार्गो इमारतीमध्ये यू.एस.एन्टरप्राजेस या जागतिक लॉजेस्टिक कंपनीतर्फे नियादारांसाठी बांधलेल्या १६ लाखांच्या शीतगृहाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

लॉजेस्टिक हबच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात निर्यात व्हावी यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, देशात जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर नागपूर येथून मोठय़ा प्रमाणात निर्यातीला प्राधान्य राहणार आहे. त्यादृष्टीने नागपूर विमानतळाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली असून बांधकामाच्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. मिहानमध्ये येत्या काळात मोठी गुंतवणूक होणार असून विमान वाहतूक क्षेत्रात बोईंग एमआरओ, अंबानी एव्हीएशन या उद्योगांबरोबरच टाटा उद्योग समूहांसोबत चर्चा सुरू असून येत्या काळात मोठय़ा प्रमाणात प्रकल्प सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

मिहानमध्ये बाबा रामदेव यांच्या फळपक्रिया उद्योसोबतच इतरही उद्योगांनी येथे उद्योग सुरू करण्यासंबंधी इच्छा व्यक्त केली आहे. या उद्योगाच्या निर्यातीसाठी शीतगृह साखळी निर्मितीची मागणी लक्षात घेऊनच ही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात यापेक्षा मोठय़ा क्षमतेची शीतगृहाची आवश्यकता भासणार असल्यानेच विमानतळावरील कार्गो इमारतीमध्ये दोन मोठय़ा शीतगृहासाठी जागा उलब्ध करून देण्यात आली असून त्याव्दारे मालवाहतूक विमानांच्या माध्यमातून थेट निर्यात करणे सोयीचे होणार आह, असे फडणवीस म्हणाले.