राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो वैद्य यांचे मत; साप्ताहिक विदर्भ मिररचे लोकार्पण

देशात काही नवीन राज्ये आंदोलन न करता, तर काही आंदोलनामुळे मिळाली आहेत. तेलंगणासाठी बरीच आंदोलने झाली. विदर्भासह इतरही बऱ्याच राज्यांमध्ये ती सुरू असून मला या आंदोलनांशिवाय लहान राज्ये व्हावीत, असे वाटते. प्रत्येक राज्याची एकच भाषा रहावी, हे योग्य असले तरी एकाच भाषेची एकच नव्हे, तर दोन-चार राज्ये असल्यास कुणाला हरकत नसावी. हिंदीप्रमाणे मराठी भाषेचीही अनेक राज्य होणे चांगले आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.

शनिवारी ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर ‘विदर्भ मिरर’चे संस्थापक श्रीहरी अणे, ज्येष्ठ मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रिजचे विशाल अग्रवाल, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, ‘विदर्भ मिरर’चे संपादक विनोद देशमुख, संदीप सिंगलकर उपस्थित होते.

मा.गो. वैद्य म्हणाले की, प्रत्येक भागाच्या सर्वागीण विकासासाठी केंद्र शासनाने सगळ्या राज्यांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. या राज्यांची लोकसंख्या प्रत्येकी ३ कोटींवर नसावी. देशातील विद्यमान राज्यांची रचना योग्य नाही. सध्या देशातील काही राज्यांची लोकसंख्या कोटय़वधींमध्ये, तर काहींची लाखातही आहे. उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड स्वतंत्र झाल्यावरही या राज्याची लोकसंख्या १९ कोटी ९८ लाखांवर आहे. बिहारची लोकसंख्या झारखंड हा राज्य वेगळा झाल्यावरही १० कोटी ४८ लाखांवर आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींवर, झारखंड ३ कोटी २० लाख, सिक्कीम ६.१० लाख, मेघालय २९ लाख, नागालँड १९ लाख, त्रिपुरा ३६ लाख, पंजाबची लोकसंख्या २ कोटी ८७ लाख, तर तेलंगणाची लोकसंख्या सुमारे ३ कोटी आहे. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येमुळे तेथील विविध विकासकामांवर परिणाम होत असल्याचे माझे वैयक्तीक मत आहे. केंद्राकडून राज्यांच्या पुनर्रचनेवर काही काम सुरू असून त्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच ठाकूर, कौशल सिंग यांच्यासह काही मंडळी मला भेटून गेली. यावेळी लहान राज्यांच्या महत्वावर चर्चा झाली. मी रा.स्व.संघाचा कार्यकर्ता असून संघातही महाराष्ट्राचे विदर्भासह चार वेगवेगळे प्रांत विविध सामाजिक कामाकरिता निश्चित आहेत. सगळ्या प्रांतात संघ आपल्या व्यवस्थेनुसार काम करतो.

‘विदर्भ मिरर’ हे स्वतंत्र विदर्भाला समर्थन असलेल्या सगळ्याच संघटनांचे बोलणे मांडणारे चांगले माध्यम ठरू शकते, परंतु या साप्ताहिकात संयुक्त महाराष्ट्राला समर्थन असलेल्यांचेही मत मांडून त्याला लेखनातून कसे उत्तर देता येईल, हे बघण्याची गरज आहे. या प्रकाराने विदर्भाला विरोध असलेल्यांचेही मतपरिवर्तन होण्यास मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.

विदर्भ मिररराज्यनिर्मितीची कोनशिला -श्रीहरी अणे

विदर्भाचे आंदोलन लोकनायक अणे, ब्रिजलाल बियाणी, जांबुवंतराव धोटे आणि आताचा काळ, अशा तीन खंडात विभागलेले आहे. सध्याचा लढा हा राज्य निर्मितीकरिता शेवटचा लढा आहे. कोणीही व्यक्ती एकटय़ाच्या लढय़ाने राज्य मिळवू शकत नाही. त्याकरिता सामूहिक सगळ्याच बाजूंवर लढण्याची गरज आहे. राज्यव्यवस्था उलथवण्यासाठी राजकीय विकल्पाचीही गरज आहे. विदर्भातील कुपोषित मुले, फासावर लटकून मेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची अवस्था, बेरोजगारीचे वाढते प्रमाण बघून स्वतंत्र विदर्भाची गरज स्पष्ट होते. विदर्भाच्या नावावर लढलेल्या आघाडींनी काटोल आणि तुमसरला मिळवलेले यश अभूतपूर्व आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विदर्भवाद्यांच्या कामाबाबतच्या  सगळ्या घटना ‘विदर्भ मिरर’ मध्ये मांडल्या जाणार असून ही साप्ताहिक राज्यनिर्मितीची कोनशिला ठरू शकेल, असे मत विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.