मराठा आणि कुणबी असा वाद निर्माण झाल्याने मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजनानंतर शहरातील मराठय़ांच्या संख्यात्मक ताकदीचा अंदाज आला असून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ‘मराठा कार्ड’ कितपत प्रभावी ठरू शकेल, याबाबत शंका निर्माण केली जात असली तरी मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या काही उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे.

नागपुरातील महाल, सक्करदरा आणि दिघोरी आदी वस्त्यांमध्ये मराठा समाजाची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. ही संख्या नगरसेवकांचे भवितव्य ठरवण्यात निर्णायक ठरू शकेल, परंतु शहरातील इतर भागात निवडणुकीत प्रभाव पाडू शकेल एवढे बळ नाही. व्होट बँकेचे गणित कायम जात, धर्म आणि भाषा आणि पक्ष यावर ठरत आले आहे. मुस्लीम, बौद्ध, छत्तीसगडी, उत्तर भारतीय असे शहरात मतदान होत आले आहे, परंतु मराठा, ओबीसीतील अठरापगड जाती अशी जातनिहाय ‘व्होट बँक’ शहरात तयार झाली नाही. स्थानिक पातळीवर पक्ष जातनिहाय मतांची दखल घेतो, हे वगळे. मात्र, याचे चित्र प्रत्यक्ष मतदानात उमटत नव्हते. नागपूर महापालिकेत मराठा समाजाचे दोन नगरसेवक आहेत. हे दोन्ही नगरसेवक काँग्रेसचे असून महिलांसाठी राखीव जागांवर निवडून आले आहेत.

voter lists, Chandrapur,
जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त
यूपीएससीमध्ये मराठी यशवंतांच्या संख्येत घट
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

मोर्चा निमित्ताने मराठा समाज एकजूट झाला. मोर्चात राजकारण आणण्याची अजिबात इच्छा नसली तरी या निमित्ताने महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे ‘मराठा कार्ड’ गवसल्याचे दिसून येते. यंदाच्या निडणुकीत ‘मराठा कार्ड’ कसे चालेल, याची चाचपणी नेतेमंडळी करू लागली आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत ‘मराठा कार्ड’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे एका नेत्याचे म्हणणे आहे. संपूर्ण राज्यात सर्व मतभेद विसरून समाज इतक्या मोठय़ा संख्येने एकत्र येत आहे. त्याचे प्रतिबिंब महापालिका असो वा जिल्हा परिषद निवडणुकांवर निश्चित पडेल, असे त्या नेत्यांचे म्हणणे आहे. सकल मराठा क्रांती मूक मोर्चासंदर्भात कुणा एकाचे नाव पुढे करायचे नसल्याने या नेत्याने नाव प्रकाशित न करण्याची अट घातली.

दरम्यान, माजी नगरसेवक मनोज साबळे यांचे मत वेगळे आहे. महापालिकेची निवडणूक जनसंपर्क आणि केलेल्या विकास कामांवर लढवली जाते. यात जात या घटकाचा प्रभाग कमी असतो. मी आणि माझी पत्नी ज्या भागातून निवडून येतो, त्या भागात मराठा समाजातील लोकसंख्या कमी आहे, असे साबळे म्हणाले.

जातीय ध्रुवीकरण

यापूर्वी शहरात मराठा आणि कुणबी असा वाद नव्हता. यामुळे मराठा समाजातील उमेदवार असला तरी कुणबी आणि इतर बहुजन समाजातील लोक त्यांना मतदान करीत होते. कोपर्डी येथील घटनेनंतर मोर्चे काढण्यात येत आहे. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण झाले आहे. शिवाय मोर्चाच्या शीर्षकामध्ये कुणबी शब्द वापरण्यावरून वाद निर्माण करण्यात आला. या वादाला जाती-जातीतील वर्चस्वाची लढाई याची किनार होती. यामुळे बहुजन समाज त्यांच्यापासून दुरावण्याची भीती आहे. मराठा मोर्चामुळे मराठा समाज एकवटून ज्या भागात ते अधिक आहेत, त्या प्रभागात प्रभाव पाडू शकतील, असे काहींना वाटते. यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत सर्वच पक्षाला किमान एक-दोन ठिकाणी तरी मराठा उमेदवार देण्यावर विचार करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.