माजी मंत्री जयंत पाटील यांचा आरोप
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर रघुराम राजन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी चांगले काम करीत असताना त्यांनी अनेक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मात्र मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी त्यांना पदावरून हटविले, असा आरोप राज्याचे माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांनी केला.
बी.जे. अग्रवाल लिखित ‘भंवर मे सियासत’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी वित्तमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रकाश वैदिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, माजी खासदार विजय दर्डा, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, भाजपचे नेते जयप्रकाश गुप्ता, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रघुराम राजन यांनी देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले, बँकेच्या थकबाकीदाराकडून कर्ज वसुलीचे आदेश त्यांनी बँकांना दिले. प्रसंगी प्रकल्प विक्रीला त्याची भरपाई करण्याची सूचना केली. त्यामुळे उद्योजक मोदी सरकारच्या आश्रयाला गेले. उद्योजकांचे भले करण्यासाठी केंद्र सरकारने रघुराम राजन यांचे जगणे कठीण केले. त्यामुळे राजन यांनी आपल्या कार्यकाळाला मिळणारी मुदतवाढ स्वीकारली नाही. सत्तेत राहण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार मोठय़ा गोष्टींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपने सत्ता हस्तगत केलेल्या राज्यातच स्वराज्य संस्थेचे निकाल त्यांच्या विरोधात जाण्याची भीती आहे. भरीव कामगिरी अभावी जनतेचे मन सरकार विरोधात कलुषित झाले आहे. त्यामुळे आगामी अडीच वर्षांनंतर निश्चितच राज्याची जनता भाजपला नाकारतील, अशी चिन्हे आहे.
अ‍ॅड. अग्रवाल यांनी लिहिलेल्या ‘भंवर मे सियासत’ या पुस्तकात विविध मुद्यांना स्पर्श करण्यात आला आहे. संवेदनशीलतेतून हे लेखन झाले असून वाचनीय आणि चिंतन करायला लावणारे आहे, असेही पाटील म्हणाले. अ‍ॅड अग्रवाल म्हणाले, वैदर्भीय शेतकरी सर्वात दुखी आहे. मात्र विदर्भातील नेते स्वार्थ असेपर्यंत विदर्भावर बोलतात. मात्र स्वार्थ संपला की त्यावर बोलत नाही. यावेळी डॉ. वैदप्रकाश वैदिक यांचेही भाषण झाले.