विविध प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले!

सभागृहात विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करून शिवसेनेच्या अल्का दलाल यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना अडचणीत आणले. विशेषत: सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी यांच्या प्रभागातील महापालिका शाळेतील भ्रष्टाचार उघडकीस आणून चौकशीची मागणी करीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.

बस्तरवारी प्रभाग क्रमांक १७ मधून दुसऱ्यांदा महापालिकेत प्रतिनिधीत्व करताना दलाल यांनी गेल्या पाच वर्षांत प्रभागातील सिमेंट रस्ते, मलवाहिनीसह प्रभागातील महापालिकेच्या रुग्णालयात विविध सोयी सुविधा निर्माण केल्या आहे. या प्रभागात बराच भाग झोपडपट्टीबहुल असल्यामुळे या भागातील महिलांना काम मिळावे आणि त्यांच्या वस्तीमध्ये सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केले. सभागृहात मांडलेल्या त्यांच्या प्रश्नावर महापौरांनी चौकशीचे आदेश दिले. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्या आशीर्वादाने त्यांच्याच प्रभागात असलेली महापालिका शाळा ही खासगी संस्थेला देण्यात आली असताना त्या शाळेचे वीज बिल, पाण्याची देयक आणि शाळेच्या देखभाल दुरुस्तीवर महापालिका खर्च करीत असल्याचे प्रकरण सभागृहात उपस्थित केल्यावर या विषयावर बराच गदारोळ झाला होता. सभागृहात हा विषय येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले असताना दलाल यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन आणि चौकशीची मागणी केली. या शिवाय महिलांचे शौचालय आणि बचत गटातील महिलांना काम मिळवून देण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. मस्कासाथमधील वाहतुकीच्या रस्त्यावर असलेल्या बाजार विभागाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक केंद्राचा प्रस्ताव असताना त्याची अंमलबजावणी होत नव्हती मात्र तो प्रस्ताव सभागृहात आला आणि त्याला मान्यता मिळाली.

प्रभागात मूलभूत समस्या कायमशिवसेनेच्या अल्का दलाल यांच्या कार्यकाळात गेल्या पाच वषार्ंत कुठलीच विकास कामे दिसून आली नाहीत.

शिवसेनेच्या अल्का दलाल यांच्या कार्यकाळात गेल्या पाच वषार्ंत कुठलीच विकास कामे दिसून आली नाहीत. ज्या मूलभूत समस्या पूर्वी होत्या त्या आजही कायम आहे. सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र, अन्य कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले.  विशेषत मलवाहिनी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आजही कायम आहे. त्यांना मिळालेला निधी त्यांनी कुठल्या विकास कामासाठी खर्च केला याची माहिती आता नागरिकांना दिली पाहिजे. अनेक वस्त्यांमध्ये आजही डांबरी रस्ते खराब झाले आहेत. मात्र, दुरुस्ती केली जात नाही. झोपडपट्टीबहुल भागात विकास कामे करण्यात आली नाही. काही वस्त्यांमध्ये पथदिवे नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी महिलांना त्या भागातून जाणे कठीण झाले आहे. कुठली विकास कामे केली हे त्यांनी दाखवून द्यावे.

रेखा यादव, २०१२ च्या महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार.

प्रभागात केलेली कामे

  • खैरीपुरा, शांतीनगर, प्रेमनगर या भागात रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण
  • झाडे चौकातील अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण
  • पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली.
  • सांडपाणी व मलवाहिनीची कामे
  • उद्यान आणि रुग्णालयांचा विकास
  • झोपडपट्टी परिसरात डांबरी रस्ते

सभागृहात मांडलेले विषय

  • मस्कासाथ भागातील महापालिका शाळेचे खासगीकरण
  • महिलांसाठी शौचालये
  • खासगी संस्थेकडून काम काढून बचतगटाला देण्यात आले.
  • महिलांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स
  • ओसीडब्ल्यू- नळाचे कनेक्शन