प्रकल्पांच्या आराखडय़ात बदल करण्यासोबतच त्यावर अवास्तव खर्च करण्याची नागपूर सुधार प्रन्यासची पंरपरा राहिली आहे. अनेक प्रकल्पांवर झालेला खर्च व त्याची उपयोगिता लक्षात घेतली तर तो व्यर्थ ठरतो, अशा तक्रारी आता लोकप्रतिनिधीही करू लागले आहेत.
उत्तर नागपुरातील गुरु गोविंद सिंग स्टेडियम उभारण्याऐवजी केवळ प्रशासकीय इमारत, संरक्षण भिंत आणि खेळाचे मैदान तयार करण्यात दीड कोटी रुपये खर्च होत असतील तर हा निधीचा अपव्यय आहे, असा आरोप माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला. नागपूर सुधार प्रन्यासने मूळ आराखडय़ाला बगल दिल्याबद्दल आणि संरक्षण भिंती तसेच खेळाचे मैदान सपाट करण्यात दीड कोटी रुपये लागल्याबद्दल नितीन राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले.
लष्करीबागेतील बाजीराव साखरे वाचनालय, वैशालीनगरातील राजीव गांधी जलतरण तलाव, अशोकनगरातील राममनोहर लोहिया वाचनालय आणि एकता कॉलनीतील गुरू गोविंद सिंग स्टेडियममध्ये नासुप्रच्या मनमानी कारभाराचा अनुभव आला. बाजीराव साखरे वाचनालय साडेचार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे. वैशालीनगरातील जलतरण तलावाचा किस्सा देखील असाच आहे. येथे केवळ टाकी बांधण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. महालेखाकाराने देखील या प्रकल्पावर ताशेरे ओढले आहेत. नासुप्रला पुरेसा निधी उपलब्ध असताना जलतरण तलाव तयार करण्यात आला नाही. त्याऐवजी आधी जलतरण तलावाजवळ क्लब हाऊस बांधण्यात आला. सुधार प्रन्यासच्या चुकीच्या नियोजनामुळे शासकीय निधीचे नुकसान झाले. या प्रकल्पाची किंमत अनेक पटीने वाढली. यासाठी राऊत यांनी निधी दिला होता. जलतरण तलावाची चाचणी घेतली तेव्हा टाईल्स निघाल्या होत्या. पोहणाऱ्यांसाठी स्वच्छता गृह आणि पोर्च उभारण्याचा मुद्दा होता. एका मोठा हॉल येथे असणे आवश्यक होते. परंतु नासुप्रने याही मुद्यांकडे कानाडोळा केला. राममनोहर लोहिया वाचनालयात अधिक मुलांनी एकाचवेळी अध्ययन करण्याची सोय करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. जुनी इमारत आणि नवीन इमारत मिळून मोठा वाचनकक्ष उभारण्याची सूचना केली होती. परंतु जुन्या आणि नवीन इमारतीच्या उंचीमध्ये सुमारे पाच ते सहा फूट अंतर ठेवण्यात आले. यामुळे येथे सलग मोठा कक्ष होऊ शकला नाही. अशाप्रकारे लोकप्रतिनिधींच्या सूचना न पाळण्याचा सुधार प्रन्यासचा एक कलमी कार्यक्रम असतो. यामुळे कोटय़वधी रुपयांचा अपव्यय होत आहे.

वविध कामांच्या संदर्भात नागपूर सुधार प्रन्यासकडे तक्रार किंवा सूचना केल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही, याचा आपल्याला अनुभव आहे. अनेक कामांवर अवास्तव खर्च झालेला आहे.
– नितीन राऊत,
माजी मंत्री व काँग्रेस नेते.