’ ग्राहक तासंतास राहतात उकाडय़ात ’ उन्हाळापूर्व देखभाल, दुरुस्तीवर प्रश्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्य़ात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहे. तापमान वाढले असतानाच या घटनांमुळे ग्राहकांना तासंतास उकाडय़ात राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्य़ात वीज कंपन्यांकडून झालेल्या उन्हाळापूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर प्रश्न उपस्थित झाले आहे.

केंद्राने नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शहर जागतिक दर्जाचे होणार असल्याचे स्वप्न लोकप्रतिनिधी नागरिकांना दाखवत आहेत. या प्रकल्पात शहरातील वीज यंत्रणा अद्यावत होऊन ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा मिळणार असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यातच शहरात रोज कोटय़वधींच्या कामाची घोषणा होत असून पैकी अनेक झाल्याचाही दावा होतो. परंतु अद्यापही अनेक ग्राहकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहराचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असताना केव्हाही वीज जात असल्याने नागरिकांना उकाडय़ाचा त्रास होतो. शुक्रवारच्या रात्रीपासून शहरातील अनेक भागात वारंवार वीज पुरवठा खंडित झाला. धरमपेठ व सिव्हील लाईन्सच्या बऱ्याच भागात रात्री ३ वाजताच्या सुमारास वीज गेली. वीज पुरवठा सुमारे दीड तास खंडित राहिल्याचा एसएनडीएलचा दावा असला तरी ग्राहकांनी जास्त वेळ वीज खंडित राहिल्याचा आरोप केला. राजनगरसह इतरही काही भागात अशाच पद्धतीने वारंवार वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या छत्रपतीनगर परिसरातही शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वीज एक ते दीड तास नसल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप झाला. नियमानुसार वीज कंपन्यांनी उन्हाळ्यात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणूण देखभाल व दुरुस्तीच्या कामावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. परंतु वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने या कामांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाले आहे.

पुन्हा वीज तार तोडली!

नागपूर मेट्रोला महावितरणच्या वतीने भूमिगत वीज वाहिन्यांचे सगळे नकाशे दिले असतानाच त्यांचे कंत्राटदार वारंवार चुकीच्या पद्धतीने महावितरणच्या वीज तारा तोडत असल्याचे पुन्हा पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर अंबाझरी मार्गावरील वीज तार तोडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी १.१५ वाजताच्या सुमारास जयताळा भागात नागपूर मेट्रोचे काम करणाऱ्या जेसीबीने पुन्हा वीज तार तोडली. त्यामुळे या भागातील शेकडो ग्राहकांना तासंतास अंधारात रहावे लागले.