स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासाचा अभ्यास
अमरावतीच्या वाईल्डलाईफ अ‍ॅन्ड एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (वेक्स)चे पक्षी अभ्यासक गेल्या चार वर्षांपासून पक्ष्यांच्या परतीच्या प्रवासाचा अभ्यास करीत असून यादरम्यान वेक्सने अनेक दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. या सर्वेक्षणादरम्यान डॉ. आशिष चौधरी व डॉ. मनोहर खोडे यांना अमरावती जिल्ह्यातील वरूडनजिकच्या सावंगा तलावावर एप्रिलच्या अखेरीस उलटचोच तुतारी (टीक सँडपायपर) या दुर्मीळ पक्ष्याची नोंद घेण्यात यश आले आहे. डॉ. आशिष चौधरी यांनी त्याची छायाचित्रेसुद्धा घेतली आहेत. या पक्ष्याची विदर्भाच्या पक्षीसुचीत फार पूर्वीच नोंद आहे. मात्र, तो अलीकडे सापडल्याची नोंद नाही. त्यामुळे ही नोंद विदर्भातील महत्त्वाची व अमरावती जिल्ह्यातील प्रथम नोंद असल्याची माहिती वेक्सचे सचिव व मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.
हिवाळ्यात या परिसरातील अनेक पाणवठय़ांवर व देशभरातील पाणवठे व समुद्र किनाऱ्यावर परदेशातून विविध प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. हिवाळा संपल्यावर ते त्यांच्या मूळ प्रदेशात परत जातात. मार्चपर्यंत ते परत गेल्यानंतर एप्रिल व मे दरम्यान दक्षिण भारतात स्थलांतर करून गेलेले पक्षी परतीच्या प्रवासादरम्यान आपल्या प्रदेशाकडे जाताना काही दिवस किंवा अल्प काळासाठी मुक्काम करतात. त्यावेळी त्यांना बघण्याची संधी पक्षीनिरीक्षकांना मिळते. हा पक्षी सामान्य तुतारीपेक्षा सुमारे ५ से.मी.ने मोठा असून याची चोच काळ्या रंगाची, जाड, लांब व वरच्या दिशेने वळलेली असते. पायाचा रंग पिवळा असून पाय लांब असतात. शरीराचा रंग राखडी, खांद्यावर काळपट रंग व छातीचा भाग पांढरा असतो. याचे शास्त्रीय नाव झेनुस सिनेरिअस असे असून मराठीतील ओळख उलटचोच तुतारी, अशी आहे. महाराष्ट्रात हा पक्षी समुद्रकिनाऱ्यावर नियमितपणे येत असतो. विदर्भात मात्र तो फक्त परतीच्या प्रवासादरम्यानच दिसतो. वरूड तालुक्यातील अनेक तलावांवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून पक्ष्यांच्या नोंदी घेत असतो. सावंगा तलाव हा स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास असल्याचे मत डॉ. आशिष चौधरी यांनी व्यक्त केले.
हिवाळ्यात भारताच्या पूर्वेकडील व पश्चिम समुद्र किनारा, तसेच अंदमान निकोबार, श्रीलंका आदी ठिकाणी स्थलांतर करून येणारा हा पक्षी उन्हाळ्यात व विणीच्या हंगामासाठी सायबेरिया, फिनलँड या ठिकाणी आढळतो. कॅस्पियन समुद्राच्या पश्चिमेला वाहणाऱ्या टेरेक नदीच्या नावावरून याचे नाव टीक, असे पडले आहे. भारतातील समुद्र किनाऱ्यावरून आपल्या मूळ ठिकाणी परतताना तो मध्य भारतातून जात असावा, असा अंदाज व्यक्त करून अशा वेडर्स (चिखलात राहणारे) पक्ष्यांचा मागोवा घेत असताना एप्रिलच्या शेवटी हा पक्षी वरूडनजीकच्या सावंगा तलावावर आढळला. यंदाही वेक्सचे डॉ. जयंत वडतकर, निनाद अभंग, किरण मोरे आदी पक्षी अभ्यासक विदर्भातील अनेक ठिकाणांवर लक्ष ठेवून आहेत. या नोंदीमुळे विदर्भातील पक्षी संपन्नतेत भर पडली असून परतणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रवास मार्गाबाबत अभ्यासकांच्या माहितीत भर पडणार असल्याचे मत वेक्सचे सचिव व अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.