मुख्यमंत्र्यांचा सवाल

मुख्यमंत्री म्हणून राज्याचा समतोल विकास होतो की नाही, हे बघण्याची जबाबदारी माझी आहे. गत काळात विदर्भाला त्यांचा हिस्सा मिळाला नाही म्हणून तो आम्ही देत आहोत. यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रातील राष्ट्रीय संस्था विदर्भात नेण्यासह निधीवाटपाच्या बाबतीतही विदर्भाला झुकते माप दिले जात असल्याची टीका मंत्री विनोद तावडेंसह विदर्भाबाहेरील सर्वपक्षीय नेते करीत असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही भूमिका मांडली. राज्याच्या इतर भागांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही फेटाळला.
निम्मे अधिकारी ऐकत नाहीत
सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनाकडून सहकार्य मिळत नव्हते, पण कालांतराने चित्र बदलत असले तरी वरिष्ठ पातळीवर ३० टक्के व खालच्या पातळीवर ५० टक्के अधिकारी ऐकत नाहीत, अशी कबुलीच फडणवीस यांनी दिली. या संदर्भात त्यांनी सरकारच्या दोन परिपत्रकांचे (टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविणारे आणि मांसविक्रीवर बंदी आणणारे) उदाहरण दिले. हे परिपत्रक काढताना अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना आणि प्रधान सचिव पातळीवरच्या अधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले नव्हते.