बंदद्वार क्रीडा संकुलातील वातानुकूलित यंत्रणा बंद

भरगच्च क्रीडा संकुल.. शंभर, दोनशे नव्हे तर तब्बल पाच ते सहा हजारांची उपस्थिती.. आणि अशा बंदद्वार क्रीडा संकुलातील वातानुकूलित यंत्रणा बंद.. केंद्रीय मंत्र्यांपासून तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला असतानाही बंद वातानुकूलित यंत्रणेबद्दल चक्कार शब्द न काढता दोन ते तीन तासांचा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. साऱ्यांनी सारे काही सहन केले ते फक्त वाघांसाठी!

मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमातच वनखात्याशी संबंधित राज्यस्तरावरील विविध पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याने राज्यभरातून जंगलालगतच्या गावातील लोक कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे हे बंदद्वार क्रीडासंकुल पूर्णपणे भरले होते. अशातच वातानुकूलित यंत्रणाही बंद असल्यामुळे अंगातून घामाचे लोट वाहात असतानाच विविध शाळांमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जंगल आणि व्याघ्र संवर्धनावर आधारित कार्यक्रम सादर करून वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याची जाणीवही दूर सारली. विशेष म्हणजे यावेळी चिमुकल्यांच्या हस्ते व्यासपीठावरील उपस्थित पाहुण्यांना वाघांच्या प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आल्या.

सुधीर मुनगंटीवार यांनी बंद वातानुकूलित यंत्रणेबद्दल मानकापूर क्रीडा संकुल व्यवस्थापकाच्यावतीने क्षमा मागितली आणि त्याच्या दुरुस्तीसाठी वित्तमंत्री म्हणून लागणाऱ्या पैशाची व्यवस्था करण्याचीही हमी दिली. भविष्यात वातानुकूलित यंत्रणा आवश्यक आहे हे सांगतानाच क्रीडा संकुल व्यवस्थापकाची कदाचित दूरदृष्टी असावी आणि ती शब्दातून नाही तर कृतीतून समजून घ्यावी. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास होत राहिला तर पृथ्वी गॅस चेंबर झाल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश व्यवस्थापकाला द्यायचा असावा, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून आलेल्या गावकऱ्यांचा उत्साह कार्यक्रमाच्या वेळी पावसाची सर कोसळली तरीही अखेपर्यंत कायम होता. शेकडो वाहनांची गर्दी कार्यक्रमस्थळी जमलेली होती.  कार्यक्रमस्थळीच त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणि नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. या कार्यक्रमाला आणि पुरस्कारविजेत्यांना मिळणारा टाळयांच्या प्रतिसादही मोठा होता. तब्बल तासभर उशिरा कार्यक्रम सुरू झाल्याने कार्यक्रम मात्र आवरता घ्यावा लागल्याने निवेदकांचीही तारांबळ उडताना यावेळी दिसून आली.

क्षणचित्रे

  • बोर अभयारण्याचे कॉफी टेबल बुक, बटरफ्लाईज ऑफ पेंच टायगर रिजव्‍‌र्ह, स्टेट्स ऑफ व्हल्चर इन महाराष्ट्र स्टेट, जलयुक्त शिवार अशा चार पुस्तकांचे प्रकाशन आणि वृक्ष लागवडीदरम्यान काढण्यात आलेल्या वृक्ष दिंडीच्या सिडीचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
  • ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघिणीच्या तिच्या पिलासह घेण्यात आलेल्या छायाचित्रावर आधारित टपाल तिकिटाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. हे छायाचित्र घेणारे छायाचित्रकार अमोल बैस तसेच रमण कुळकर्णी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
  • हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘पाणीदार मुख्यमंत्री’, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख ‘निर्णयाला गती’ देणारा मंत्री असा केला.
  • वनखात्याशी संबंधित गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत करावयाचे असल्याने व्यासपीठावर एकापाठोपाठ एक समित्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत होत्या. या गोंधळात अनेकांचे प्रमाणपत्र आणि बक्षिसांची अदलाबदल झाली. अखेरीस कार्यक्रमाच्या शेवटी ही प्रमाणपत्रे बदलून देण्यात आली.