हजार रुपयांत उत्पन्नाचा बनावट पुरावा

नवी मुंबईतील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्णांनी तीन लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला सादर केल्यास त्यांना वाशी येथील हिरानंदांनी फोर्टिज रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील, असा करार महापालिका आणि रुग्णालयात करण्यात आला आहे. त्याचा गैरफायदा घेत नवी मुंबईतील अनेक राजकीय मंडळींनी आपले नातेवाईक, कार्यकर्ते आणि मतदार यांना मोफत उपचार मिळवून दिले आहेत. कुकशेत येथील मकरंद म्हात्रे या रुग्णावरील उपचारामुळे ही बाब उघडकीस आली आहे. हा उत्पन्नाचा खोटा दाखला आणि शिधापत्रिका वाशी येथील एका सेवा केंद्रातून एक हजार रुपयांत तयार करून मिळत असल्याचे उघड झाले आहे. हा दाखला बघून सार्वजनिक रुग्णालय शिफारस समिती तथाकथित गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याची शिफारस फोर्टिज हिरानंदानी समूहाकडे करीत आहे.

नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर १०मधील सार्वजनिक रुग्णालयाच्या इमारतीतील दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळ हिरानंदांनी हेल्थ केअर समूहाला १० वर्षांपूर्वी भाडेपट्टय़ाने दिले आहे.

अतिशय अल्प भाडेपट्टय़ाने देण्यात आलेल्या या जागेच्या बदल्यात हिरानंदानी फोर्टिज (हिरानंदांनी हेल्थ केअर समूहाने ही जागा नंतर फोर्टिज समूहाला भाडेपट्टय़ाने दिलेली आहे. पालिकेच्या या व्यवहाराबद्दल मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे.) रुग्णालयाने १० टक्के गरीब, गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्याची हमी दिली आहे. या सवलतीत केवळ उपचारांचा अंतर्भाव असून औषधांची सोय रुग्णांना करावी लागते. गेली सहा वर्षे ही सवलत दिली जात असून वर्षांला ८०० रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. त्यामुळे सहा वर्षांत ही संख्या पाच हजार रुग्णांपर्यंत गेली आहे. अशा प्रकारे अपात्र व्यक्तींना लाभ मिळवून देण्यात कामात वाशीतील अनेक नगरसेवक पटाईत असून आपले नातेवाईक, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यासाठी ही तडजोड केली जात आहे. यासाठी पालिका रुग्णालयातील डॉक्टर व इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी त्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करीत असल्याचे आढळून आले आहे. उत्पन्नाचा दाखला आणि वास्तव्याच्या दाखल्यासाठी लागणारे शिधापत्रक आणि पॅनकार्ड तपासून पाहिल्यानंतर रुग्णालयीन शिफारस समिती जास्त चौकशी न करता थेट फोर्टिजमध्ये रुग्णाला सेवा देण्याची शिफारस करून मोकळी होते.

कुकशेत येथील मकरंद म्हात्रे यांच्यावरील उपचारादरम्यान ही बाब उघडीस आली. म्हात्रे यांना काही महिन्यांपूर्वी राजकीय वैमनस्यातून बेदम मारहाण झाली होती. त्यामुळे त्यांना प्रथम पालिका रुग्णालयात आणि नंतर शेजारच्या फोर्टिज हिरानंदांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत, यासाठी बेलापूरच्या ताईंनी शिफारस केली होती. त्यासाठी लागणारे बनावट दाखले मकरंद यांचे वडील जयदास म्हात्रे यांनी तयार करवून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर असून तशी तक्रार पालिकेच्या आरोग्य विभागाने वाशी पोलीस ठाण्यात केली आहे. दीड महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात असणाऱ्या म्हात्रेंवर १७ लाख रुपये खर्चाचे देयक माफ केल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण उघडकीस येण्यास राजकीय वैमनस्य कारणीभूत असून म्हात्रे यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ८० हजारांपेक्षा कैकपटींनी जास्त असल्याचे आरोग्य समिती सभापती सलुजा सुतार यांना सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी वैद्यकीय विभाग गेला. गेली अनेक वर्षे हजारो श्रीमंत रुग्णांनी  खोटी कागदपत्रे सादर करून उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाच जणांच्या शिफारस समितीकडे देण्यात आलेली कागदपत्रे पाहून गरीब रुग्णांची शिफारस केली जाते. यात उत्पन्नाचा दाखला आणि वास्तव्याचा दाखला महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या या दाखल्यांवर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही.

– डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधीक्षक, वाशी  रुग्णालय