कृष्णा हाइट, रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स   कोपरखैरणे

कोपरखैरणे येथील कृष्णा हाइट, रेसिडेंशिअल कॉम्प्लेक्स ही बँकेच्या कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. व्यावहारिक गोष्टींमध्ये काटेकोरपणा ठेवतानाच इथल्या रहिवाशांनी परस्परांतील आपुलकी जपली आहे. या संकुलातील रहिवासी एका कुटुंबाप्रमाणेच परस्पर स्नेहबंध जपतात. बँक कर्मचाऱ्यांचा तात्पुरता निवारा, अशी औपचारिकता न बाळगता सगळे एकत्रितपणे काम करतात.

कोपरखैरणे येथील  ‘कृष्णा हाइट’ या संकुलात इलाहाबाद या बँकेचे अधिकारी राहतात. या सोसायटीच्या आवारतच इलाहाबाद बँक आहे. १७ मजली संकुलात एकूण ३४ सादनिका आहेत. येथे जरी सोसायटीमध्येच बँक असली तरी बँकेचे कामकाज संपल्यानंतर सगळी औपचारिकता गळून पडते. देशाच्या कानाकोपऱ्यातून हे कर्मचारी आले असल्यामुळे इथे विविध संस्कृतींचा मिलाफ पाहायला मिळतो.

आम्ही बँकेचे व्यवहार आणि त्यामुळे होणारे लाभ उत्तम जाणतो. म्हणूनच आम्ही नात्यांमध्ये आपुलकीची गुंतवणूक करतो आणि त्याचे भरघोस व्याज मिळवतो, असे येथील रहिवासी अभिमानाने सांगतात.

नवी मुंबई या शांत आणि नियोजनबद्ध आधुनिक शहरात राहण्याची संधी या बँकेच्या निमित्ताने मिळाली याबद्दल येथील रहिवासी समाधानी आहेत. इमारतीपासून जवळच शाळा, महाविद्यलय आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या शिक्षणाची उत्तम सोय झाली आहे. देशाच्या विविध भागांतून आलेले लोक इथे आपापल्या संस्कृतीचा दुरभिमान न बाळगता एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण करत राहतात.

या सोसायटीमध्ये बहुभाषिक, विविध धर्माचे नागरिक एका छत्रछायेखाली एकोप्याने नांदत असल्याने  पुढे कोणत्याही संस्कृतीची परंपरा लाभलेल्या संकुलात आम्ही आनंदात बागडू शकतो, व्यावहारिक नाते जोडून आयुष्याची  गुंतवणूक करून जीवनभर माणुसकीची पुंजी जमा करून ठेवी स्वरूपात साठवून ठेवत आहोत. त्याच ठेवी  आम्हाला आमच्या संकटसमयी तारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विविध उपक्रम

संकुल तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आले. संकुलातील रहिवाशांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे म्हणून विविध कार्यक्रम आणि समारंभांचे आयोजन केले जाते. बँकेच्या कामातून वेळ काढून संकुलात दीड दिवसाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. या दीड दिवसात बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. बँकेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेतली जातात. आम्हाला विविध सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत. समाजात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आमचा थोडासा हातभार लागला तर आनंदच होईल, असे येथील रहिवासी सांगतात.