‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाअंतर्गत नागरिकांची मते जाणून घेणार

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रत्येक आठवडय़ातून एक दिवस मॉर्निग वॉक, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी सुसंसाद साधणार आहे. या वेळी नागरिकांची मते, तसेच समस्या जाणून घेणार आहेत. नागरिकांच्या त्यावर प्रशासनाला काय करावे लागेल, याविषयी काही सूचनांचा विचारही आयुक्त करतील, असे सूत्रांनी सांगितले.
‘वॉक विथ कमिशनर’या अभिनव उपक्रमाद्वारे रविवारी सकाळी ७ वाजता सीबीडी बेलापूर येथील सागर विहार जॉगिंग ट्रॅकवर पहाटे चालण्यासाठी आयुक्त येतात. याच वेळी उद्यानात येणाऱ्या नवी मुंबईकरांशी आयुक्त थेट संवाद साधणार आहेत. यात जनतेला महापालिकेकडून असलेल्या अपेक्षा आणि संकल्पना जाणून घेणार आहेत. या वेळी पालिका आयुक्तांना नागरिकांशंी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे ‘ वॉक विथ कमिशनर’ उपक्रमातून जनतेच्या सूचना व संकल्पना जाणून घेत आधुनिक आणि स्मार्ट शहरनिर्मितीकडे लक्ष केंद्रित करणार आहेत. तर नवी मुंबईकर नागरिकांसमवेत सहकारी अधिकाऱ्यांसह सुसंवाद साधल्याने नवी मुंबई शहराच्या विकासाला लोकाभिमुख गती येईल, असे स्पष्ट करीत वॉक विथ कमिशनर या अभिनव उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिक चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.