सुरक्षा दलाने ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशीनंतर सुटका

उरणमध्ये पाच दहशतवादी घुसल्याच्या संशयानंतर नौदलाने सुरू केलेली शोधमोहीम थांबविण्यात आली असली, तरी केंद्रीय सुरक्षा दलाने उरण व पनवेल तालुक्यांच्या वेशीवर शनिवारी तिघांना ताब्यात घेतले. हे तिघेही मूळचे जम्मूतील असून, तीन महिन्यांपासून ते उरणमधील खोपटा येथे ‘अमेय लॉजिस्टिक’मध्ये चालक, सहचालक व मदतनीस म्हणून काम करीत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

सिकंदर मोहम्मद सईद (२८), सोहेल मोहम्मद तरब (१८) व अत्ताउल्ला अब्दुल हक (२०) अशी या तरुणांची नावे आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी गव्हाणफाटा येथे एका ट्रकजवळ काही संशयित तरुण उभे असल्याचे पाहिले. जवानांनी या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न करताच ते पळाल्याने जवानांचा संशय बळावला. काही अंतर पाठलाग करून त्यांनी या तिघांना पकडून पनवेल पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडे पॅनकार्ड व इतर ओळखपत्रे सापडली. सिकंदरचे वडील जम्मूमधील पॅँॅूछ येथे पोलीस दलात हवालदार आहेत. तर सोहेलचे काका पोलीस अधीक्षक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे तिघेही अमेय लॉजिस्टिकमध्ये काम करतात. याआधी ते जे. के. फाइट्स या कंपनीत काम करत होते.

अमेय लॉजिस्टिकमध्ये चालकांना कार्गो कामगारांचे गणवेश दिले जातात. या कपडय़ांवर हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. या तिघांची शरीरयष्टी, कपडे आणि बॅगांमुळे जवानांचा संशय बळावला होता. मात्र, हे तिघेही कामगार असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

पनवेल ते सीबीडी खाडीकिनारपट्टी असुरक्षित

पनवेल ते सीबीडी बेलापूर या परिसराला मोठय़ा प्रमाणात खाडीकिनारपट्टी लाभली आहे. वाळू उपसा करणारे या किनारपट्टीचा सर्वाधिक वापर करतात. परवाने नसलेल्या किंवा कोणत्याही प्रशासनाकडे नोंद नसलेल्या सुमारे १५० लहान बोटींद्वारे येथे बेकायदा वाळूउपसा केला जातो. या किनारपट्टीची सुरक्षेची जबाबदारी रायगडचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई पोलीस दलाच्या सागरी पोलिसांची आहे.