दुचाकींवरील गोविंदांकडून हॉर्न वाजवून शहरभर ध्वनी प्रदूषण

दहिहंडीची उंची आणि गोविंदाच्या वयोमर्यादेवर सर्वोच्च न्यायालयाने चाप लावल्याने वैतागलेल्या गोविंदानी दुचाकींवर बसून कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने नागरिकांना त्रास दिला. अनेकांनी वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने त्याचा फटका इतर प्रवाशांना बसला.

दरम्यान नवी मुंबईत अनेक आयोजकांनी दहीहंडीतून माघार घेतल्याने फार कमी संख्येने हंडय़ा बांधण्यात आल्या. त्यामुळे दुपारीच काही हंडय़ा फोडण्यात आल्या. ऐरोली, कोपरखैरणे आणि नेरुळ येथे काही मोठय़ा उंचीच्या दहीहंडय़ा लावण्यात आल्या होत्या.

या वेळी पोलिसांच्या कारवाईला न  जुमानता काही गोविंदा मंडळांनी ठिकठिकाणी रस्ते वाहतुकीचे नियम डावलण्यात धन्यता मानली. या वेळी पोलिसांनीही त्यांना ध्वनिप्रदूषण करण्यापासून रोखले नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते.

काळे झेंडे फडकावून निषेध

पनवेल : दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या थरांवर सर्वोच्च न्यायालयाने र्निबध घातल्याने गोविंदा मंडळांनी नाराजी व्यक्त केली. गोविंदा पथकांनी चार थरांचे मानवी मनोरे रचून सलामीच्या चौथ्या थरावरून काळे झेंडे दाखविण्यात आले. पनवेल शहर व परिसरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रत्येक दहीहंडीच्या ठिकाणी पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात की नाही, हे पाहण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण केले जात होते. पनवेलमध्ये नवनाथ हंडीचा उत्सव पाहण्यासाठी लाइन आळी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चाबकाचे फटके मारणे, अंगात संचारलेल्या व्यक्ती एकमेकांसमोर उभ्या राहून एकमेकांना भिडणे अशा पद्धतीने पारंपरिक हंडी साजरी करण्यात आली.

न्यायालयाचा आदेश धुडकावला

चार थरांहून अधिक मानवी मनोरे लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला नवी मुंबईतील गोविंदा मंडळांनी धुडकावत लाखांच्या हंडय़ांसाठी नियमांचे उल्लंघन केले. काही ठिकाणी २० फुटांहून अधिक उंच हंडय़ा बांधण्यात आल्या होत्या, तर आयोजकांनी रस्त्यावर हंडी बांधल्याने वाहनांची कोंडी झाली होती. ठाणे आणि मुंबईतून दुचाकींवरून फिरणाऱ्या तरुणांनी काही ठिकाणी हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करीत नागरिकांच्या त्रासात भर घातली. दुचाकीवर तिघे तरुण बसल्याचे चित्र होते. काही हेल्मेट न घालताच दुचाकी फिरवत होते. दहीहंडीच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती हंडय़ांच्या ठिकाणी पालिकेची परवानगी न घेता बेकायदा लावल्या होत्या. याच वेळी शहरात काही मंडळांनी हंडय़ा रद्द केल्या होत्या.

उरणमधील अनेक दहीहंडय़ा रद्द

उरण : सर्वोच्च न्यायालयाच्या र्निबधाच्या पाश्र्वभूमीवर गुरुवार साजऱ्या करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात उरणमधील अनेक मंडळांनी आपल्या हंडय़ा रद्द केल्या. न्यायालयाचा आदर करीत उरण नगर पालिकेने सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला ११ हजार रुपयांचे बक्षीस देऊन दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात आली होती. उरण तालुक्यातील गावोगावी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. गावातील मंदिरात रात्री बारा वाजता कृष्णजन्म सोहळ्याला सुरुवात करून मंदिरात पारंपरिक पद्धतीने हंडी फोडल्यानंतर गावातील हंडय़ा फोडल्या जातात. त्यानंतर पालखी काढून गोविंदा गावात फिरतात. अशी परंपरा गेली अनेक वर्षांपासून आहे. त्यानुसार उत्साहात हा सण साजरा झाला.