नवी मुंबईत १ लाख ८८ हजार झाडे असल्याचे वृक्षगणनेतून स्पष्ट

सुनियोजित शहर, शिक्षण संस्थांचे शहर, सायबर सिटी अशी अनेक बिरुदे मिरवणाऱ्या नवी मुंबईला एक नवी ओळख लाभली आहे, ती म्हणजे ‘सुबाभुळाचे शहर’. नवी मुंबई महापालिकेने नुकत्याच पूर्ण केलेल्या वृक्षगणना सर्वेक्षणात या शहरात एकूण आठ लाख ५७ हजार २९५ वृक्ष असल्याची नोंद झाली असून ही संख्या येथील लोकसंख्येच्या तुलनेत तीन लाखांनी कमी आहे. नवी मुंबईची लोकसंख्या सुमारे ११ लाख ५७ हजार आहे. पुण्यातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात या शहरात १ लाख ८८ हजार झाडे सुबाभुळाची असून ही संख्या इतर वृक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

आंबे, जांभूळ, बोरं, ताडगोळे, नारळ, अशा असंख्य वृक्षांची वनसंपदा असलेल्या नवी मुंबईच्या निर्मितीत ४० वर्षांपूर्वी अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकीच जुनी स्वदेशी झाडे या शहरात दिसून येतात. त्याऐवजी परदेशी झाडे लावून सिडको व पालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे. मुंबईला पर्याय म्हणून नवीन शहर वसविताना सिमेंटचे जंगल निर्माण झाले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठय़ा घाऊक बाजारपेठेत म्हणजेच एपीएमसीत केवळ २०-३० झाडे आहेत. येथील व्यापाऱ्यांनी ३० वर्षांत एकही झाड लावून ते वाढवलेले नाही. नवी मुंबई पालिकेच्या १०८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी ४६ टक्के जमीन सिडकोने मोकळी सोडली असली तरी वृक्षसंवर्धनाच्या नावाने आनंदी आनंदच असल्याचे नुकत्याच झालेल्या नवी मुंबई पालिका क्षेत्रातील वृक्षगणनेवरून स्पष्ट दिसून येते. सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेल्या ७२ उद्यानांमध्ये थोडी भर घालून पालिकेने शहरासाठी ९० उद्याने विकसित केली आहेत, मात्र यातील वृक्षसंपदा ही पाच मीटरपेक्षा कमी उंचीची आहे. या वृक्षसंपदेत खुरटय़ा वृक्षांची गणना न करता पाच मीटरपेक्षा मोठय़ा झाडांची गणना करण्यात आली आहे. ती ८ लाख ५७ हजार २९५ इतकी आहे. त्याखालोखाल आंब्याच्या झाडांची संख्या ६ हजार ५५० आहे. पुण्यातील सार टेक नावाच्या कंपनीने हे सर्वेक्षण केले असून यामुळे वृक्षांची सद्य:स्थिती समजणार असून वृक्षसंवर्धनावर पालिकेची नजर राहणार आहे.

एमआयडीसीसाठी उपयुक्त माहिती

नवी मुंबई पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या सव्‍‌र्हेक्षणाची माहिती एमआयडीसीने मागून घेतली आहे. एमआयडीसी विभागातील भूखंड विकताना अथवा एखादा औद्योगिक प्रकल्प उभारताना ही माहिती उपयोगी येणार आहे. पालिकेने केलेली ही अद्ययावत व आधुनिक पद्धतीची वृक्षगणना आहे.

राज्यातील स्थानिक प्राधिकरण दर पाच वर्षांनी त्यांच्या हद्दीतील वृक्षांची गणना करते. नवी मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ८ लाख ५७ हजार २९५ पाच मीटरपेक्षा उचं वृक्ष आढळले आहेत. ही संख्या शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी असून ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धन आणि रोपण या दोन्ही बाबींकडे येत्या काळात लक्ष दिले जाणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका