चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांची राजकीय कारकीर्द इ.स. १८०१ ते १८५१ अशी झाली. सुरुवातीला पेशव्यांच्या आदेशाने परशुराम पटवर्धनांसोबत करवीरच्या छत्रपतींविरुद्ध मोहिमेत आणि कंपनी सरकारच्या जनरल वेलस्ली आणि सरदार धोंडोपंत गोखले यांच्याबरोबर धोंडाजी वाघ या दरोडेखोराविरुद्ध कर्नाटकातील मोहिमेत चिंतामणरावांनी मोठी कामगिरी बजावली. त्यामुळे वेलस्लीशी त्यांचे चांगले संबंध तयार झाले. गणेशभक्त असलेल्या चिंतामणरावांनी १८११ साली गणपती मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. सांगलीचे भूषण असलेल्या या गणपती मंदिराचे काम पूर्ण होण्यास तब्बल ३० वष्रे लागली. या मंदिराचे नाव पुढे ‘गणपती पंचायतन’ असे झाले.
चिंतामणराव प्रथम हे प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी व्यापारउदीम वाढवून निरनिराळ्या बाजारपेठा वसविल्या, सांगलीत मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या हळदीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन त्याची बाजारपेठ निर्माण केली. सरळ, रुंद रस्ते बांधून त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड सुरू केली. त्यांनी १८२१ साली प्रथम शिळाप्रेस छापखाना स्थापन केला. व्यापाऱ्यांना अनेक सवलती देऊन त्यांनी सांगलीत रेशीम उद्योगाचा पाया घालून, मॉरिशसहून उच्च दर्जाचा ऊस आणून त्याची लागवड सुरू केली. स्वतची नाणी पाडण्यासाठी त्यांनी सांगलीत टांकसाळही सुरू केली. गुणग्राहक, कल्पक, बहुआयामी चिंतामणराव यांनी ठिकठिकाणचे विद्वान, कलाकार, कारागिरांना राजाश्रय देऊन सांगली हे दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनविले. विष्णुदास भावे यांच्याकडून ‘सीतास्वयंवर’ हे नाटक लिहून घेऊन राजांनी मराठी रंगभूमीवरचा पहिला नाटय़प्रयोग केला. १८१९ साली सांगलीचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारशी संरक्षणाचा करार होऊन ते एक संस्थान बनून राहिले. १८५१ साली या महान राज्यकर्त्यांचे निधन झाले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
कुतूहल

धारवाडी साडी

साडी खरेदी हा एक दीर्घकाम चालणारा अध्याय असतो. साडीची निवड करताना साडीचा आतला रंग, त्या रंगाची काठातल्या रंगाशी जमणारी जोडी, काठातील नक्षी, काठाची रुंदी, पदर, त्यावरचे नक्षीकाम, त्यांची रंगसंगती आणि सर्वात जास्त ही साडी नेसणार त्या स्त्रीला ती साडी नेसल्यावर शोभेल की नाही असे अनेक मुद्दे लक्षात घेतले जातात. या पलीकडे जाऊन साडीचा पोत, रंगाची हमी (जी आता दुरापास्त झाली आहे), किंमत अशाही काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात, पण अगदी मोजक्या साडय़ांच्या बाबतीत निवड पटकन होते. तिथे साडीचे सौंदर्य माहीत असल्यामुळे पसंतीची मोहर लवकर उमटवली जाते. अशीच एक साडी म्हणून ‘धारवाडी’ साडीचे वर्णन करता येईल. अर्थात धारवाड परिसरात विणली जाणारी ती धारवाडी साडी हे ओघाने आलेच. ह्य़ा साडीचा वापर महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्याच्या सरहद्दीवर धारवाडच्या परिसरात प्रामुख्याने होतो. गडद आणि फिकट तपकिरी तसेच हिरवा रंग हा धारवाडी साडीचा स्थायीभाव आहे. यामध्ये वर्षांनुवष्रे बदल झालेला नाही. इतर काही बदल झाले असतील तर ते गौण आहेत. धारवाडी साडी तसेच खण सुतीच असतात. साडीवर अंगभर चौकटी पसरलेल्या दिसतात. तसेच दोन्ही बाजूने तपकिरी लाल छटांची नक्षी असते. पदरावर समांतर नक्षी असते. विशेष प्रसंगाला या साडीचा वापर पूर्वापार होत आला आहे.
धारवाडी साडय़ांत फारशी विविधता नाही. तरी अतिशय तलम सुती धारवाडी साडी गृहिणीप्रिय आहे. या साडय़ांवर नसíगक रंगाच्या चौकटी असतात तर काठावर काळ्या, तपकिरी, लाल व पांढऱ्या रंगाचा वापर केल्याने साडी उठावदार दिसते. त्यामुळेच ती सर्वाच्या पसंतीला उतरते. पदरावरती समांतर मोहक नक्षी या साडीचे खास वैशिष्टय़ म्हणून लक्षात घ्यायला हवे. साधी पण सुंदर असे या साडीचे वर्णन केले तर ते योग्यच ठरेल. पूर्वापार वापरात असलेली ही साडी कायम नेसणाऱ्यांमध्ये ख्यातनाम गायिका गंगुबाई हनगल यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. अशाच अनेक स्त्रिया धारवाडी साडीच्या चाहत्या आहेत. त्यात काहींना साडीचा साधेपणा आवडला असावा, तर काहींना त्याचे सौंदर्य भावत असावे. याचमुळे स्त्रीच्या पसंतीला येणारी, खूप चिकित्सा न करता खरेदी केली जाणारी साडी म्हणून धारवाडी साडीचा उल्लेख करता येईल.
> दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org