‘ओट्रक्कुषल’ या गोविंद शंकर कुरुप यांच्या १९५० मध्ये प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहाला १९६५चा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.  त्यांच्या काही उत्कृष्ट प्रेमकविताही या संग्रहात आहेत. पण हे प्रेम स्त्री-पुरुषांतले नाही, पती-पत्नीतलेदेखील नाही. तर ते प्रेम प्रकृती आणि ब्रह्मचेतना यांमधले आहे. त्या प्रेमाचे मूळ म्हणजे हे सृष्टिचक्र आहे. या संग्रहात काही काव्यकथादेखील आहेत, देश, राष्ट्रभक्तीबद्दलच्याही कविता आहेत.  कवी निसर्ग आणि त्याची शिव-सुंदराची रहस्यमय अनुभूती यांमधून वाचकाला पराचेतन शक्तीचा आभास देतो. या विश्वाच्या चैतन्याचा तोही एक अनादि-अनंत असा अंश आहे याची प्रचीती देतो.

वयाच्या नवव्या वर्षी कवीने काव्यलेखनाला सुरुवात केली आणि १९२३ ते २९ मध्ये ‘साहित्यकौतुकम्’चे चार खंड प्रकाशित झाले. एकूण २५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘सूर्यक्रान्ति’ (१९३२), ‘निमिषम्’ (१९४५), ‘अन्तर्दाहं’, ‘विश्वदर्शनम्’, ‘पाथेयम्’ इ. त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत. १९७२ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यांचे ‘मधुरम् सौम्यम् दीप्तम्’, ‘वेळिच्चतिष्टे दूतम्’ आणि ‘सान्ध्यरागम्’ हे तीन काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत.

काव्य, निबंधसंग्रह, नाटक, बालसाहित्य, आत्मकथा आणि अनुवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केलं आहे. ‘सान्ध्य’, ‘ऑगस्ट १५’ इ. तीन नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘ओम्र्मयुटे ओलंगलिल’ हे दोन खंडांतील त्यांचे आत्मकथन १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले. १९४८ मध्ये त्यांनी ‘निर्मला’ या चित्रपटासाठी गीतलेखनही केले आहे.

बंगाली, संस्कृत, फ्रेंच, फारसी इ. भाषांतील काही साहित्याचे अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच कुरूपजींच्या रचनांचे हिन्दी, इंग्रजी इ. अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. धारवाड येथील प्रसिद्ध हिन्दी भाषाप्रेमी मट्टतिरिजी यांनी कुरूपजींच्या अनेक कवितांचे हिन्दी पद्यानुवाद केले आहेत.

केरळ साहित्य परिषदेच्या ‘परिषद’ या मुखपत्राचे ते संपादक होते. मल्याळी साहित्य परिषदेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते, तसेच १९६८-७२ या काळात  राज्यसभा सदस्य  होते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मोजमापनासाठी प्रमाणीकरण ()

मोजमापनाचे प्रमाणीकरण करणे किती आवश्यक आहे हे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अतिशय प्रकर्षांने पुढे आले. कारण विविध देशांच्या आघाडय़ांमध्ये युद्धसामग्रीचे प्रमाणित स्वरूप नसल्याने अनेक गोंधळ उद्भवले. जसे की एका देशात निर्माण केलेले सुटे घटक, काडतुसे किंवा तोफेचे गोळे दुसऱ्या देशाच्या बंदुका वा तोफांसाठी वापरणे शक्य होत नसे. तसेच पायदळाला साधे अंतर मोजण्यापासून ते वायुदलाला तापमान कळवण्यात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. कारण मापन दर्शवणाऱ्या व्यवस्था भिन्न होत्या.

या सगळ्या बाबींची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात आणि निर्यात सुलभ करण्याच्या दृष्टीने लंडनमध्ये १९४६ साली २५ देशांचे प्रतिनिधी एकत्र जमले. त्यांनी औद्योगिक उत्पादने प्रमाणित होतील, असे बघणे तसेच त्याचा पाठपुरावा करणे यासाठी

‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द स्टॅण्डर्डायझेशन’ म्हणजेच ‘आयएसओ’ ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तिचे कार्य १९४७ मध्ये सुरू झाले. मात्र ‘आयएसओ’ ही संज्ञा इंग्रजीतील आद्याक्षरांनी तयार केली नसून ग्रीक भाषेतील ‘आयसोस’ म्हणजे ‘सारखे’ या शब्दापासून बनलेली आहे. आता ‘आयएसओ’चे कार्यसेवा, सुविधा, संगणक अशा विविध क्षेत्रांत विस्तारलेले आहे. १४ ऑक्टोबर हा ‘जागतिक मानक’ दिन म्हणून साजरा करणे हे मोजमापन प्रमाणीकरणाचे औचित्य दर्शवते.

महत्त्वाचे म्हणजे भारत स्वतंत्र होत असताना भविष्याची गरज ओळखून जून १९४७ मध्येच इंडियन स्टॅण्डर्ड्स इन्स्टिटय़ूशन (आयएसआय) ही संस्था एक सोसायटी म्हणून स्थापन करण्यात आली. डॉ. लालचंद बर्मन हे तिचे प्रथम संचालक होते. भारतात मोजमापनाची मानके निर्माण करणे, ही तिची मुख्य जबाबदारी होती. आणि तिने तयार केलेले प्रथम मानक हे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे होते. १९५२ साली कायद्याने तिला राष्ट्रीय स्तरावर मानक – प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार दिला. यामुळे देशातील औद्योगिकीकरणाला भरीव फायदा मिळाला.

तिचे योगदान लक्षात घेऊन संसदेने १ एप्रिल १९८७ पासून या संस्थेला ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स (बीआयएस) असा उच्च दर्जा दिला. तरी आयएसआय, बीआयएस आणि खाद्यवस्तूंसाठी एफपीओ अशी मानके असलेली उत्पादने भारतात प्रमाणित मानली जातात.

डॉ. विवेक पाटकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

चित्रसंदर्भ : wikipedia.org