जिनोआ शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी जिनोआ शहर नगर प्रशासनाने नऊ म्युनिसिपींमध्ये विभागणी केली आहे. जिनोआ शहराचे दोन मुखवटे आहेत. एक मुखवटा जिनोआच्या मध्ययुगीन स्थापत्य आणि कलासंस्कृतीचे प्रतीक तर दुसरा मुखवटा औद्योगिकीकरण झालेल्या आधुनिक जिनोआचा आहे. यामुळे जिनोआला ‘ए सिटी ऑफ टु सोल्स’ म्हटले जाते. ‘ला सुपर्बा’ असेही या शहराला म्हटले जाते. जिनोआ बंदरातील ‘लॅन्टेर्ना’ हे दीपगृह आता शहराचे प्रतीक बनलेय. जिनोआ शहरापासून सहा कि.मी. वर असलेल्या ख्रिस्तोफोरो कोलंबो विमानतळावरून आंतरदेशीय आणि देशांतर्गत हवाई सेवा चालते. शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी बससेवेचा वापर अधिक केला जातो. ६०० बसगाडय़ा रोज ३१ हजार कि.मी. अंतर धावत असतात. रेल्वेसेवेचाही वाहतुकीसाठी वापर केला जातो. जिनोआ शहर एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला पर्वतरांगांच्या सापटीत वसल्यामुळे काही वस्ती डोंगर उतारावरही आहे. त्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी माऊंटन केबलकारचा वापरही सर्रास केला जातो. शहराच्या जुन्या, ऐतिहासिक अवशेष असलेल्या भागात अरुंद रस्त्यांमुळे बससेवेचाच वापर अधिक केला जातो. शहराच्या नव्या भागातच मोठे कारखाने असल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. १९९२ साली कोलंबसच्या अमेरिकेच्या पहिल्या सागरी मोहिमेला ५०० वष्रे झाली. त्यानिमित्त जिनोआच्या जुन्या बंदराचे आधुनिकीकरण करण्यात आले. जिनोआ हे उत्तर इटालीतील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनलेय. १४७१ साली स्थापन झालेले जिनोआ विद्यापीठ ही या प्रदेशातली सर्वात जुनी शिक्षणसंस्था. येथील नौकानयन आणि नौदलाचे शिक्षणक्रम महत्त्वाचे. हे शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण इटालीतून विद्यार्थी येथे येत असतात. साडे सहा लाख लोकवस्तीच्या या शहराचे अर्थकारण प्रामुख्याने सागरी व्यापार आणि अवजड औद्योगिक प्रकल्पांवर चालते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

खाजणवनांतील अनुकूलन

खारफुटी झाडांची मुळे खारे पाणी शोषू शकतात, कारण त्यांच्या पेशींतील रसांत जास्त क्षार असतात. शोषलेले पाणी पानांपर्यंत पोहोचते, पानांच्या पृष्ठभागात विशेष आकाराच्या ग्रंथी असतात. त्या ग्रंथीमध्ये मीठ साचते. काही दिवसांनंतर साठलेल्या मिठाचे स्फटिक पांढऱ्या ठिपक्यांच्या रूपांत पानांवर दिसतातही.

भरती-ओहोटीच्या पाण्यामुळे अस्थिर असलेल्या दलदलीत स्थिरपणे वाढण्यासाठी मुळांचे आकारही विशेष असणे जरुरीचे आहे. हे विशेष आकार म्हणजे अस्थिर चिखल घट्टपणे पकडून ठेवणारी मुळांची जाळी. खारपर्णी झाडाच्या मुळांना इतक्या फांद्या फुटतात की अक्षरश: चिखलात घट्ट जाळी तयार होतात. या जाळ्यात चिखल अडकून बसतो, हलत नाही. जाळ्यांचा पसारा करणाऱ्या मुळांचे चिखलावरचे आकार वेगवेगळे असतात. तिवरांची मोठी मुळे चिखलात आडवी पसरतात आणि त्यांना काटकोनात पाण्याच्या वर येणाऱ्या, बोटासारख्या दिसणाऱ्या  फांद्या फुटतात. या हवेतील मुळावर छिद्रे असून त्यातून मुळे हवेतील ऑक्सिजन घेऊन श्वासोच्छ्वास करतात. चिर्पीची मुळेही अशाच प्रकारे वाढतात. पण ती जाड खुंटय़ासारखी दिसतात. कांदळाची मुळे म्हणजे मुख्य खोडाच्या चिखलाकडे जाणाऱ्या फांद्या. चिखलात पोहोचल्यावर या आधारमुळांना अनेक फांद्या फुटून जाळी तयार होते. कांदळ-बृगीरा प्रकारात बुंध्यावरून निघालेल्या फांद्या चिखलाला स्पर्श करतात, वर आकाशाकडे डोकावतात आणि परत जमिनीत शिरतात- त्यांचा आकार गुडघ्यासारखा दिसतो. या सर्व प्रकारच्या मुळांवर श्वासासाठी छिद्रे असतात आणि ती मुळाच्या आतील हवेच्या पोकळ्यांशी संपर्कात असल्याने मुळे गुदमरून जात नाहीत. काही जुन्या, खूप उंच वाढलेल्या, २०-२५ मीटर उंचीच्या कांदळाची आधारमुळे बुंध्याभोवती फळ्यासारखी वाढून झाडाला आधार देतात.

चिखलाला पकडून ठेवणारी मुळे जमिनीवरून पावसा-पाण्याबरोबर येणारा कचरा-माती पकडतात. गाळलेले पाणी खाडीत जाते, पण सर्व घन पदार्थ मुळात अडकतात, कुजतात, त्या गाळाची माती खाजणात साचते. परिणामी खाजण क्षेत्रात भर पडते. पूर्व मुंबईच्या ठाणे खाडीकाठाच्या खाजणात शेकडो हेक्टर जमिनीची वाढ झाल्याचे जुन्या-नव्या नकाशांच्या तुलनेमुळे दिसून आले आहे.

–  प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org