वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या मोजमापांविषयी आपण माहिती घेतो आहोत. जगातले विविध देश, त्यांच्यामधले तज्ज्ञ – सगळे एकत्र येऊन याविषयी निर्णय घेतात. पण अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. प्रत्येक देशात, काही वेळा एकाच देशातल्या विविध प्रांतांत वेगवेगळी मापनपद्धती वापरली जात असे. एकंदरीत शेतीप्रधान संस्कृतीत व्यापार मर्यादित होत, प्रवासही फार होत नसे, त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धती चालून जात.

कालांतराने देशादेशांमधल्या मापनातला फरक ध्यानात यायला सुरुवात झाली, ती विशेषत: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. मित्र राष्ट्रांमध्ये अमेरिकन आणि ब्रिटिश सनिक एकत्र लढत होते. काही बांधकाम सुरू असताना त्यांच्या लक्षात आलं की, एक अमेरिकन फूट हा एक ब्रिटिश फुटापेक्षा ०.०००४% ने लांब होता. हा फरक अतिशय अल्प दिसला, तरी कित्येक हजार फुटांचं बांधकाम करताना तो वाढत वाढत जाऊन चांगलाच मोठा होतो. त्यामुळे काही प्रमाणीकरण करावं, काही मापं जगाच्या पाठीवर कुठेही समान असावीत हा विचार मूळ धरायला लागला.

पण एक फुटाची लांबी नेमकी किती असावी यावर अमेरिकन आणि ब्रिटिश यांचं एकमत होण्यासाठी वीस र्वष लागली! कळस म्हणजे तोपर्यंत फुटाच्या जागी दशमान पद्धतीतलं मीटर एकक वापरणे हेच जास्त योग्य वाटायला लागलं होतं!

इथे कोलंबसची आख्यायिका सांगितलीच पाहिजे. त्याला जायचं होतं आशिया खंडात, भारतात. त्यासाठी पोर्तुगालहून पूर्वेला जाण्याऐवजी पृथ्वी गोलाकार असल्याने पश्चिम दिशेने प्रवास करूनही आपण भारतात पोचू शकतो याची त्याला खात्री होती. पण प्रवासाचा मार्ग आखताना त्याने नॉटिकल म्हणजे सागरी मल (१८५२ मीटर) हे एकक वापरायच्या ऐवजी सवयीने रोमन म्हणजे जमिनीवरचे मल (१४८१ मीटर) वापरले. त्यामुळे अंतराच्या आकडेमोडीत जवळजवळ २५% फरक पडला!

आज जगात सगळीकडे मापनात सुसूत्रता आली आहे. प्रमाणित एककांचाच वापर होतो आहे. तरीही काही वेळा कुठेतरी चूक होते आणि त्याचे भयंकर परिणाम होतात. या आठवडय़ात आपण मापनातल्या गफलतींमुळे झालेल्या काही घटना पाहणार आहोत.

 मेघश्री दळवी –  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : कुर्रतुलऐन हैदर – कादंबरीलेखन

कादंबरीलेखन हे कुर्रतुलऐन हैदर यांचं पहिलं प्रेम.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लिहिलेल्या ‘मेरे भी सनमखाने’ (१९४९) – या  हैदर यांच्या पहिल्या कादंबरीचा विषय धर्माच्या आधारावर फाळणी हाच आहे. हिंदू-मुसलमानांसाठी जी भारतीय संस्कृती प्रेमाचे, एकतेचे, गौरवाचे प्रतीक होती ती देशाच्या फाळणीनंतर उद्ध्वस्त झाली. फाळणीमुळे समाजमनावर झालेले दूरगामी परिणाम, झालेले दु:ख, लखनौमधील काही आदर्शवादी, अल्लड अशा मुलामुलींच्या सामूहिक व्यथेच्या रूपात या कादंबरीत मार्मिकपणे चितारले आहे. याच विषयावरील त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे- ‘आग का दरिया’.

‘शफिना-ए-गमे दिल’ या कादंबरीत जहागीरदार वर्गाचे चित्रण आहे. त्यांचे मित्रमंडळ, त्यांचे शिकार, नृत्य इ. शौक, फाळणीनंतर त्यांचे बदलेले जीवनमान याविषयीचे वर्णन आहे. ‘आखिर-ए-शब के हमसफर’ या कादंबरीचे स्वरूप आत्मकथनात्मक व ऐतिहासिक आहे. दीपाली सरकार या क्रांतिकारक स्त्रीच्या जीवनावरील ही कादंबरी क्रांतीचे वैफल्य चित्रित करते. ‘गर्दिशे रंगे चमन’ (१९८६) आणि ‘चांदनी बेगम’ (१९९०) या त्यांच्या आणखी दोन कादंबऱ्या.

‘कारे जहाँ दराज है’ – ही चरित्रात्मक कादंबरी दोन खंडांत प्रकाशित झाली आहे. भगवान बुद्ध आणि त्याचे दु:खविषयक तत्त्वज्ञान याविषयी लेखिकेला असलेले आकर्षण इ. अनेक उल्लेख यात येतात.

या त्यांच्या लेखनात इतिहासाचे संदर्भ देत, वर्तमानाचे भान त्यांनी ठेवलेले दिसते. बदलत्या काळातील, बदलत्या परिस्थितीत जगण्याची रीत – पद्धत बदलली तरी स्त्रीवर अन्याय होतच असतो. त्यात बदल होताना दिसत नाही हे त्यांनी लिहिलेल्या लघुकादंबऱ्यांत प्रकर्षांने जाणवते. याला अपवाद फक्त ‘दिलरुबा’ ही त्यांची लघुकादंबरी किंवा कादंबरीका. पारशी रंगभूमीपासून ते सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेले बदल, थिएटरमधील वातावरण, तेथील लोकांचे जीवन, या लोकांचे समाजातील स्थान, लोकप्रियता अशा वेगळ्याच विषयाचे दर्शन या कादंबरीकेत होते.

अन्याय करणे ही पुरुषांची वागण्याची रीतच असते – हेच त्यांनी ‘सीताहरण’, ‘अगले जनम मोहे बिटियाँ न कीजो’ या लघुकादंबऱ्यांतून चित्रित केले आहे. उत्तम व्यक्तिरेखाटन आणि त्यासाठी अचूक पाश्र्वभूमी ही त्यांच्या लेखनाचं खास वैशिष्टय़ आहेत.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com