पिंपरी पालिकेच्या वतीने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून २१० सेमी इंग्लिश बालवाडय़ा सुरू करण्यात येणार असून त्याचा लाभ सात हजार विद्यार्थ्यांना होऊ शकेल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख यांनी दिली. सेमी इंग्लिशचेच पाचवीचे ३३ वर्ग सुरू करण्यात येणार असून इयत्ता आठवीसाठी रूपीनगर, नेहरूनगर, थेरगाव, लांडेवाडी, दापोडी आणि खराळवाडीत उर्दू शाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
सेमी इंग्रजी शाळांसाठी पालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून खासगी शाळांचा अनुभवही घेतला जाणार आहे. शिक्षण मंडळाला आठवीप्रमाणेच इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग जोडावेत, अशी मागणी सदस्यांनी केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या आठवडय़ात शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल, असे सांगतानाच उशिराने वाटप होण्यास आयुक्त राजीव जाधव यांची संथ कार्यशैलीच कारणीभूत असल्याचा आरोप सभापतींनी केला. आयुक्त गतिमान हवेत, त्यांनी वेळीच निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षाही शेख व सदस्यांनी व्यक्त केली. पालिका आणि ‘सेव्ह द चिल्ड्रन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या ५० शाळांमध्ये ‘त्वरण प्रकल्प’ राबवण्यात येणार आहे. त्याद्वारे अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि गणित विषयांच्या मूलभूत क्षमता त्यांच्या बौध्दिक पातळीनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. संततुकारामनगर येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला. या वेळी आशा उबाळे, पराग मुंडे, अभिजित नाथ तसेच मायकेल अँड सुजॉन डेल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.