पिंपरी महापालिकेच्या महिला बालकल्याण योजनेअंतर्गत दीड वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटांना अनुदान देण्यासाठी मागवण्यात आलेल्या अर्जापैकी ८७१ अर्ज अपात्र ठरले आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून हे अर्ज पात्र करावेत, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी दाखल करण्यात आला.
स्थायी समितीची साप्ताहिक सभा माजी महापौर नानासाहेब शितोळे यांना श्रध्दांजली वाहून गुरूवापर्यंत तहकूब करण्यात आली. अध्यक्षस्थानी महेश लांडगे होते. आशा शेंडगे यांनी सूचना मांडली, त्यास सुनीता वाघेरे यांनी अनुमोदन दिले. या वेळी दोन विषय दाखल करून घेण्यात आले. बचत गटांना अनुदान देण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले, तेव्हा ११०१ अर्ज प्राप्त झाले. त्यातील २३० अर्ज पात्र, तर ८७१ अपात्र ठरले आहेत. पात्र बचत गटांसाठी प्रत्येकी २० हजार याप्रमाणे ४६ लाख रूपये खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव समितीसमोर आहे. जे बचत गट अपात्र ठरले आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर त्यांनाही अनुदान दिले जावे. त्यांना येणाऱ्या खर्चासही मान्यता देण्याचा समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे. याशिवाय, दूषित होणाऱ्या नदीतील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेल्या कामासाठी महापालिकेकडून एक कोटी ८८ लाख ५० रूपये देण्याचा प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात आला आहे. या दोन्ही विषयांबाबत गुरूवारी निर्णय होणार आहे.