भोसरीच्या प्रियदर्शनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी संस्थाचालक जितेंद्र सिंग यांना भोसरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. विशेष न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
भोसरीतील प्रियदर्शनी शाळेच्या आठवीच्या वर्गातील २८ विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या तासाला मराठी बोलल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. चाइल्ड लाइन या संस्थेकडे आलेल्या निनावी फोनमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी संस्थेचे चालक सिंग यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पालक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी संस्थेच्या चालकास अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सिंग यांना शुक्रवारी सकाळी अटक केली. त्यांना विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे सिंग यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.