डॉ. मनोहर डोळे यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन
लहानपणी अजाणतेपणे दृष्टिहीन भिकाऱ्याच्या ताटात टाकलेला खडा आणि त्याबद्दल वडिलांकडून मिळालेला ओरडा, घराजवळ राहणारी व दृष्टिहीन असूनही सफाईने तांदूळ निवडणारी ‘बजूबाई’, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकताना रंगून जाऊन हातांनी सिंहगड ‘पाहणारी’ दृष्टिहीन मुले.. दृष्टिहीनांच्या सहवासातील अशा आठवणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडल्या. निमित्त होते अंधत्व निवारणाच्या क्षेत्रात कार्य केलेल्या डॉ. मनोहर डोळे यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचे.
डॉ. डोळे यांच्या जीवनकार्यावर डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘नयनमनोहर’ या पुस्तकाचे रविवारी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या वेळी ते बोलत होते. डॉ. मनोहर डोळे, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ‘झी चोवीस तास’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, डॉ. शैलेश गुजर, ‘उत्कर्ष प्रकाशन’चे सु. वा. जोशी, डोळे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.
‘दृष्टिहीनांचे जीवनच वेगळे आहे. त्यांना सहानुभूतीची नाही तर प्रेमाची गरज आहे,’ असे पुरंदरे यांनी सांगितले.
मुजुमदार म्हणाले,‘आपल्याला डोळे आहेत हे आपण गृहित धरतो. एखादी दृष्टिहीन व्यक्ती समोर आल्यावर त्यांची जाणीव होते. डॉ. मनोहर डोळे यांनी त्यांच्या ‘प्रॅक्टिस’च्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात केलेली कमाई दिव्य आहे. नारायणगाव येथे जाऊन त्यांचे कार्य पाहिले की त्यांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा कळतो.’ स्वाती दीक्षित यांनी डॉ. डोळे यांचे मनोगत वाचून दाखवले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.