िपपरी भाजपने मोठय़ा उत्साहात आणि वाजतगाजत केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘रोजा इफ्तार’चा कार्यक्रम आयोजित केला. मंत्र्यांच्या विमानाची आणि कार्यक्रमाची वेळ यांचे गणित जमून आले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी जेमतेम ४० ते ५० जणांचीच उपस्थिती दिसून आली. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये कार्यक्रम उरकण्याची वेळ संयोजकांवर आली.

आकुर्डीतील हॉटेल कुंदन येथे शहर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने ‘रोजा इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी उपस्थित राहणार होते. कार्यक्रमासाठी सायंकाळी सहाची वेळ होती. मंत्र्यांना आठचे विमान होते व त्यासाठी त्यांना वेळेत विमानतळ गाठायचे होते. आकुर्डीतील पत्रकार परिषद संपवून मंत्रीमहोदय कार्यक्रमाच्या ठिकाणी आले असता, मोजकीच उपस्थिती दिसून आली. काही वेळ थांबण्याची पदाधिकाऱ्यांची सूचना अमान्य करून मंत्र्यांनी कार्यक्रम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार, स्वागत, सत्कार झाले. मंत्र्यांनी तीन ते चार मिनिटात रमजानच्या व आगामी ईदच्या शुभेच्छा दिल्या. मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत केंद्रात व राज्यात आपले सरकार असून कोणतीही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी सरकार मदत करेल, अशी ग्वाही देऊन ते मार्गस्थ झाले.

खर्चिक जाहिरातींचे समर्थन

तत्पूर्वी, आकुर्डीत पत्रकारांशी बोलताना नकवी यांनी दोन वर्षांच्या कामगिरीसाठी होणाऱ्या ‘खर्चिक’ जाहिरातींचे समर्थन केले. यापूर्वीचे सरकार काहीही न करता जाहिराती करत होते. आम्ही कामे करून जाहिराती करत आहोत, सरकारचा तो अधिकार आहे, असे ते

म्हणाले. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर रघुराम राजन यांच्यासंदर्भात विचारले असता, चांगले तसेच देशहिताचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम राहील. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे राजन यांच्याविषयीचे मत वैयक्तिक असू शकते. ते व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे. मात्र, त्यांना पक्षाचे वा सरकारचे पाठबळ देता येणार नाही. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे. खोटे आरोप होऊनही त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचे समर्थन करतानाच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.