‘पीएमपी’ बसमधील प्रवाशांकडून ५० आणि १०० च्या नोटांचा आग्रह वाहकांकडून केला जात असताना दिवसभराचा भरणा बँकेत जमा करताना मात्र पाचशे आणि हजाराच्या नोटा जमा होत असल्याचा संशय काही कामगार नेत्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे. कोणाचा तरी काळा पैसा पांढरा करण्याचा हा ‘उद्योग’ नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार चलनातील हजार व पाचशेच्या नोटा बंद झाल्यानंतर देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिथे-तिथे या नोटा घेण्यास नकार दिला जात आहे. ‘पीएमपी’सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही हाच अनुभव प्रवासी घेत आहे. कोणत्याही बसमध्ये ५० किंवा १०० च्या नोटांचाच आग्रह प्रवाशांकडे धरण्यात येत आहे. एका आगारात दिवसभराची जवळपास १० लाख रुपयांची रक्कम जमा होते. त्यामध्ये बहुतांश नोटा ५० व १०० च्या असतात. मात्र, एकत्रित स्वरूपात ही रक्कम जेव्हा बँकांमध्ये जमा होते. तेव्हा मात्र हजार पाचशेच्या नोटा जमा होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हा नेमका काय प्रकार आहे, याची माहिती मिळत नसल्याने अनेकांवर संशयाची सुई आहे. सध्या काळा पैसा पांढरा करण्याचे अनेक उद्योग सुरू आहेत. त्याचाच हा एक प्रकार असण्याची शक्यता व्यक्त करत या संदर्भात चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

दरम्यान, पीएमपी प्रशासकीय पातळीवरही या प्रकाराला अप्रत्यक्षरीत्या कबुली देण्यात आली आहेत. असा प्रकार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मोठय़ा स्वरूपात कदाचित हा प्रकार नसावा, असे पीएमपीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर उत्पन्नाचा भरणा करताना त्याचा सविस्तर हिशोब द्यावा, असे परिपत्रक काढण्यात आले होते.

यात काही गैरव्यवहार झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही यात नमूद करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

या प्रकाराची चौकशी करावी- राठी

पीएमपीच्या वाहकांना ९ नोव्हेंबरपासूनच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा प्रवाशांकडून न घेण्याबाबत लॉग शीटवर शिक्का मारून देण्यात आला आहे. पीएमपीला प्रतिदिन ६० लाखांचे उत्पन्न मिळत असून पन्नास, शंभरच्या नोटांद्वारे जमा झालेली ही रक्कम बँकेत भरताना मात्र या अधिकाऱ्यांनी आपल्याकडील हजार-पाचशेच्या नोटा बदलून हा भरणा केल्याची चर्चा समाजमाध्यमातून मंगळवारी जोरदार सुरू होती. त्यामुळे या संदर्भात पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. असा प्रकार झाला असेल तर त्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि असा प्रकार झाला असेल तर अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.