केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये (सीबीएसई) आता प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. अभ्यासक्रम पूरक उपक्रमांमध्ये या घटकांचाही समावेश करण्याच्या सूचना मंडळाने शाळांना दिल्या आहेत.
प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, तातडीच्या वैद्यकीय स्थितीत करावयाचे उपचार अशा घटकांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे परिपत्रक सीबीएसईने प्रसिद्ध केले आहे. शारीरिक शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करून त्या शिक्षकांनी या घटकांचे प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके आणि त्या खालील वर्गातील विद्यार्थ्यांना माहिती देणे अपेक्षित आहे. मंडळाच्या अभ्यासक्रम पूरक उपक्रमांमध्येही प्रथमोपचाराचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात यावे, असेही या परिपत्रकात म्हणण्यात आले आहे.
याशिवाय प्रत्येक शाळेत अद्ययावत प्रथमोपचार पेटी असावी, त्यातील औषधांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. प्रयोगशाळेत धोकादायक रसायनांचा साठा करू नये, रसायनांचा साठा आणि वापराचे तपशील नोंदवून ठेवावेत. कर्मचाऱ्यांनाही प्रथमोपचारांची माहिती असावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.