१ जूनला गाडीचा ८८ वा वाढदिवस

पुणे- मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची प्रवासवाहिनी आणि ‘सेकं ड होम’ असलेल्या डेक्कन क्वीनच्या अर्थात दख्खनच्या राणीच्या ‘डायनिंग कार’चा कायापालट करण्यात येणार आहे. अंतर्गत रचना आणि फर्निचरही बदलण्यात येणार असून, जुलैमध्ये नावीन्यपूर्ण ‘डायनिंग कार’ या गाडीला मिळणार आहे. दरम्यान, प्रवाशांच्या ही लाडक्या गाडीला १ जूनला ८८ वर्षे पूर्ण होणार आहेत. पुणे स्थानकावर यंदाही रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा त्यांच्या नेतृत्वाखाली गाडीचा वाढदिवस साजरा होणार आहे.

लिम्का बुकमध्ये नोंद असलेली आणि आयएसओ प्रमाणपत्र मिळालेल्या डेक्कन क्वीनची ‘डायिनग कार’ डिसेंबर २०१४ ला काढण्यात आली होती. प्रवाशांची मागणी आणि हर्षां शहा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १ जून २०१५ रोजी गाडीच्या ८६ व्या वाढदिवशी ‘डायनिंग कार’ पुन्हा जोडण्यात आली. आता मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांच्या पुढाकाराने दख्खनच्या राणीची ‘डायिनग कार’ कात टाकणार आहे. अंतर्गत सुविधांमध्ये त्याचप्रमाणे रचनेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. रंगसंगती आणि बैठक व्यवस्थाही बदलण्यात येणार आहे. रोजच्या प्रवाशाला डेक्कन क्वीन म्हणजे घरच असून, प्रवासाबरोबरच गाडीच्या ‘डायनिंग कार’लाही एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे बदललेली रचना पाहण्यासाठी प्रवासीही उत्सुक आहेत.

डेक्कन क्वीनचा १ जूनला ८८ वा वाढदिवस आहे. दरवर्षी या गाडीचा वाढदिवस मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. हर्षां शहा आणि प्रवासी त्यासाठी पुढाकार घेतात. गाडीच्या प्रेमापोटी भलामोठा केकही कापला जातो. यंदाही गाडीचा वाढदिवस पुणे रेल्वे स्थानकावर उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्वाना आमंत्रणही देण्यात आले आहे.