मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला आता पंचवार्षिक निवडणुकीचे वेध लागले आहे. परस्परांमधील मतभेद आणि त्यातून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेले अशीच या महामंडळाची ओळख निर्माण झाली असून आगामी निवडणुकीमध्ये तीन पॅनेलमध्ये चुरस रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामध्ये वार्षिक अहवाल आणि आर्थिक हिशेबाची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून या सभेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी दिली.
गेल्या पाच वर्षांत महामंडळामध्ये सातत्याने वाद झाले. विद्यमान संचालक मंडळातील वादविवादांमुळे गेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या युतीमध्ये फाटाफूट होणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विजय कोंडके, प्रसाद सुर्वे आणि मेघराज राजेभोसले यांची पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत. त्यासाठी भेटीगाठी घेऊन पॅनेलची जुळवाजुळव करण्याच्या कामाने वेग घेतला आहे.
महामंडळाचे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेची वाट पाहत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभा विविध मुद्दय़ांनी गाजण्याची शक्यता आहे. तीन वर्षे नाकारलेला आर्थिक ताळेबंद आणि माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचा कथित गैरव्यवहार हे मुद्दे अग्रक्रमावर आहेत. ज्येष्ठ कलावंतांचे मानधन, रखडलेले चित्रपट अनुदान, चित्रपटगृहांची उपलब्धता या विषयांमध्ये चित्रपट महामंडळ काहीही करीत नसल्याचा सदस्यांचा आरोप असून त्याचे पडसाद या सभेमध्ये उमटण्याची शक्यता आहे.