नाताळचा महिना सुरू होताच बेकऱ्यांमध्ये खाद्यपदार्थाच्या मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनाची तयारी जोरात सुरू होते. या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) बेकऱ्यांच्या तपासण्यांचे वेध लागले आहेत.
प्रत्यक्ष २५ डिसेंबरच्या आधीपासूनच कँप आणि शहरातील इतर ठिकाणच्या बेकऱ्यांमधली लगबग आणि गर्दीही वाढू लागते. ना-ना प्रकारची बिस्किटे आणि केक यांच्या उलाढालीस सुरुवात होते आणि नाताळच्या आठवडय़ात ही उलाढाल शिगेला पोहोचते. या पाश्र्वभूमीवर एफडीएने बेकऱ्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. बिस्किटे व केकसाठी वापरला जाणारा कच्चा माल, स्वच्छता आणि ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये भेटवस्तू म्हणून विक्रीस येणारी चॉकलेट्स यांची प्रामुख्याने तपासणी केली जाणार आहे.
एफडीएचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले,‘अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या परिशिष्ट ४ अनुसार अन्नपदार्थाचे उत्पादन करताना पाळण्याच्या तरतुदी पूर्ण केल्या जात आहेत का, याची पाहणी होईल. बेकऱ्यांबरोबरच नाताळ आणि नववर्षांच्या तोंडावर मोठय़ा हॉटेल व रेस्टॉरंट्सची तपासणी मोहीम देखील राबवली जाईल. बेकऱ्या व हॉटेल्समध्ये कच्चा माल कुठून आणला जातो, त्याची साठवणूक कोणत्या परिस्थितीत होते, तयार अन्नपदार्थ झाकून ठेवले जातात का, ते बनवणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी झाली आहे का, त्यांच्याकडून वैयक्तिक स्वच्छता पाळली जाते का, अशा विविध बाबींची तपासणी केली जाईल. बेकऱ्यांमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी ट्रे गंजलेले तर नाही, अशा गोष्टीही पाहिल्या जातील.’