ऑनलाइन खरेदी म्हणजे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचीच, हा रूढ समज हळूहळू मागे पडत चालला आहे. गेल्या एक ते दीड वर्षांत ऑनलाइन खरेदीत ‘फॅशन’ उत्पादने, खाद्यपदार्थ, फर्निचर आणि फुले या चार प्रकारच्या उत्पादनांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
वेगवेगळी ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळे एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देणाऱ्या ‘जंगली डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र नेरूरकर यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. नेरूरकर म्हणाले, ‘‘२०१२ मध्ये जेव्हा संकेतस्थळ सुरू करण्यात आले तेव्हा पहिल्या महिन्यात दहा लाख ग्राहकांनी खरेदीसाठी संकेतस्थळाला भेट दिली. या वर्षी (२०१४) हे प्रमाण महिन्याला २ कोटी ग्राहक असे आहे. या ग्राहकांपैकी फॅशन उत्पादने, खाद्यपदार्थ, फर्निचर आणि फुले या चार प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यास ग्राहक विशेष प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. या चार प्रकारांमध्येही फॅशन उत्पादनांसाठी ‘ऑनलाइन सर्च’ करणाऱ्यांची संख्या आणि या उत्पादनांचा ऑनलाइन खपही अधिक आहे.’’
‘फॅशन’मध्ये ऑनलाइन कपडेखरेदी विशेष लोकप्रिय होत असून, त्यात स्त्री ग्राहकांची संख्या पुरुष ग्राहकांपेक्षा अधिक आहे. पारंपरिक भारतीय पद्धतीचे कपडे (एथनिक वेअर) पाश्चात्त्य प्रकारच्या कपडय़ांपेक्षा अधिक खपत आहेत. बुटांची ऑनलाइन खरेदीही मोठय़ा प्रमाणावर होत असून त्यात मात्र पुरुष ग्राहकांचीच संख्या अधिक आहे. बाजारात चटकन न मिळणाऱ्या अन्नपदार्थाना असलेला ऑनलाइन ग्राहक मोठा असल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळय़ा प्रकारचे ‘चीज’, पास्त्याचे प्रकार, ऑलिव्ह तेल, पाश्चात्त्य पद्धतीच्या ओल्या चटण्या (डिप्स) यांना चांगली मागणी आहे. फुले ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.

‘फॅशन’मध्ये कपडे आणि दागिनेच लोकप्रिय!

कपडय़ाचे ठराविक ब्रँड्स आणि दागिने या उत्पादनांसाठी ऑनलाइन सर्च करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याची माहिती कंपनीने दिली. मनीष मल्होत्रा, रोहित बाळ या डिझायनर्सनी बनवलेले कपडे आणि ‘बीबा’ या ब्रँडचे कपडे ‘सर्च’मध्ये विशेष लोकप्रिय आहेत. अनारकली पोषाख, नववधूसाठीचा लेहंगा, साडय़ा आणि डिझायनर ब्लाऊजना गेल्या एका महिन्यात ग्राहकांनी झुकते माप दिले. दागिन्यांमध्ये पोलकी काम, मीनाकारी, कुंदन काम केलेले तसेच मोत्यांचे दागिने लोकप्रिय ठरले. मंगळसूत्रांचे विविध प्रकार ऑनलाइन बघण्यासही ग्राहकांनी पसंती दिली.

वापरलेल्या वस्तूंमध्ये ‘फर्निचर’चा खप अधिक

वापरलेल्या वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीतदेखील मोबाइल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचीच विक्री अधिक होते असा सर्वसाधारण समज असतो. परंतु वापरलेली गृहोपयोगी उपकरणे आणि वापरलेले फर्निचर यांचीही विक्री वाढल्याचे महेंद्र नेरूरकर यांनी सांगितले. अधिक चांगल्या नोकरीसाठी एका शहरामधून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणाऱ्या व्यक्ती फर्निचरवर अधिक खर्च न करण्याच्या दृष्टीने वापरलेले फर्निचर खरेदी करण्यास पसंती देत असल्याचेही दिसून येत आहे.