पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या वतुर्ळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) अंमलबजावणीसाठी नगर रचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्कीम) राबविण्यास गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

प्राधिकरणाची तिसरी सर्वसाधारण सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पालकमंत्री गिरीश बापट, अपर मुख्य सचिव डी. के. जैन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गिते, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या वेळी उपस्थित होते.

वर्तुळाकार रस्त्याच्या प्रस्तावित आखणीतील बदलांबाबत व वाढीव रुंदीबाबतच्या बदलास एमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६ मधील कमल २०(४) अन्वये शासनाच्या १७ एप्रिल रोजीच्या अधिसूचनेनुसार मान्यताप्राप्त झाली आहे. या रस्त्याची लांबी १२९ कि.मी. असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १७ हजार ४१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच प्रकल्पासाठी १ हजार ४३० हेक्टर एवढय़ा जागेची आवश्यकता असून हवेली, मावळ, मुळशी आणि खेड तालुक्यांमधील ५८ गावांमधील सुमारे २ हजार ३७ गटांमधील जागेचा समावेश आहे. प्रकल्पासाठी लागणारी जमीन नगर रचना योजनेद्वारे संपादित करण्यात येणार आहे.

प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणूक करण्यासाठी खुल्या ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आयसीसी मोनार्क या सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. अहमदाबाद शहराभोवती ७६ किलोमीटर लांबीच्या व साठ मीटर रुंदीच्या वर्तुळाकार रस्त्यासाठी ९ हजार २१५ हेक्टर एवढय़ा जागेसाठी नगर रचना योजना राबविण्यात आली असून त्याच धर्तीवर शहरातील वर्तुळाकार रस्त्यासाठी १० हजार २१४ हेक्टर जागेमध्ये नगर रचना योजना राबविण्यात येणार आहे.

वर्तुळाकार रस्त्याचे काम दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात चार पदरी रस्त्याचे काम, ३.७५ कि.मी. लांबीचे बोगदे, सहा मोठे पूल, गृहप्रकल्पांतील मोठे रस्ते आणि जमिनीचे सपाटीकरण, पाणीपुरवठा व पथ दिव्यांची कामे करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात आठ पदरी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सायकल आणि पादचारी मार्ग, विना मोटार वाहतुकीच्या सुविधा, आठ उड्डाण पूल, तीन रेल्वे उड्डाण पूल, गृहप्रकल्पांमधील अंतर्गत रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे. दोन्ही टप्प्यातील कामे पुढील सात वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत.

वर्तुळाकार रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतरापर्यंत चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) दिला जाणार आहे. त्या माध्यमातून संपूर्ण नगर रचना योजनेच्या उभारणीचा खर्च व वर्तुळाकार रस्त्यासाठी लागणारा खर्च उभारण्यात येईल. प्रकल्पाच्या सुरुवातील बीज भांडवलापोटी प्राधिकरण व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. या रस्त्यासाठी प्राधिकरणाकडून काही जमिनी विकल्या जाणार असून काही जमिनी भाडेपट्टय़ावर दिल्या जाणार आहेत.

पीएमआरडीए अंतर्गत होणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याची वैशिष्टय़े

  • लांबी- १२९ किलोमीटर, रुंदी- ११० मीटर, रस्ता- आठ पदरी
  • संपूर्ण मार्ग सिग्नलमुक्त
  • पुणे व पिंपरी-चिंचवडला वळसा घालणारा मार्ग
  • नगर रचना योजनेतील सुमारे पाचशे हेक्टर जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी
  • त्याद्वारे पीएमआरडीए क्षेत्रात २ लाखांहून अधिक घरे उपलब्ध होणार